
दैनिक चालु वार्ता
प्रतिनिधी देगलूर
संतोष मंनधरणे.
देगलूर :- एका धक्कादायक घटनेने आज (ता. 4) मुंबईकरांच्या काळजाचा ठोका चुकला. मुंबईतील सांताक्रूझ परिसरातून विद्यार्थ्यांसह चक्क स्कूल बस बेपत्ता झाली. बराच वेळ झाली, तरी आपली लाडकी चिमुकली घरी न परतल्याने पालकांमध्ये एकच खळबळ उडाली. स्कूलबसचे अपहरण तर झालं नाही ना, विद्यार्थ्यांचं काय झालं असेल, अशा प्रश्नांना पालकांच्या पोटात गोळा आला.
अखेर या प्रकरणावरील गुढ उकलले. पोलिसांनी या संपूर्ण प्रकरणाचा कसून तपास केला. नि त्यानंतर जे समोर आलं, ते वाचून डोक्याला हात लावाल नेमकं असं काय झालं होतं.
त्यातून काय समोर आलं..? याबाबत सविस्तर जाणून घेऊ या..!मुंबईतील सांताक्रूझ परिसरात पोद्दार स्कूल आहे. विद्यार्थ्यांची ने-आण करण्यासाठी या शाळेची बस आहे. नेहमीप्रमाणे आज (ता. 4) दुपारी 12 वाजता शाळा सुटल्यावर साधारण 15 विद्यार्थ्यांना घरी सोडण्यासाठी ही बस निघाली. बस शाळेतून बाहेर पडली खरी, पण कोणत्याच विद्यार्थ्याच्या घरापर्यंत पोहोचली नाही. शाळा सुटल्यापासून जवळपास 4 तास बस बेपत्ता होती. एरवी अर्ध्या तासात घरी येणारे मुले दुपारचे 2 वाजल्यानंतरही घरी न आल्याने पालकांच्या काळजाचा ठोका चूकला. विशेष म्हणजे, स्कूलबस चालकाचा मोबाईलही ‘स्वीच ऑफ’ असल्याचे सांगत होते. त्यामुळे तर काळजीत आणखी भर पडली.
अस्वस्थ झालेल्या पालकांनी अखेर शाळा गाठली. शाळांच्या प्रमुखांना जाब विचारला, पण शाळेतून समाधानकारक उत्तर न मिळाल्यानं पालकांच्या संतापाचा पारा आणखीनंच चढला. ही एक प्रतिष्ठीत शाळा असून, महागडी फी देऊन मुलांना शाळेत पाठवणाऱ्या पालकांनी या प्रकाराबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली.काही पालकांनी पोलिस ठाण्यात धाव घेतली. त्यानंतर पोलिसांनी आपली सूत्रे हलवत तपास सुरू केला. शाळा सुटल्यावर चार तासांनी म्हणजे, 4.30 वाजेच्या सुमारास स्कूलबस आणि विद्यार्थी सुखरुप असल्याचे समोर आले.. ही मुलं आपआपल्या घरी परतल्याने पालकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.
यासंदर्भात पोलिस सहआयुक्त विश्वास नांगरे पाटील माध्यमांना माहिती दिली. ते म्हणाले, की “शाळेचा आज पहिलाच दिवस होता. त्यात या स्कूल बसचा चालक हा नवीन होता.. त्याला मुंबईतील रस्त्यांची माहिती नसल्याने तो भरटकला. विद्यार्थी लवकर घरी न पोहोचल्याने सर्व पालक शाळेत आले. याबाबत मी वरिष्ठ पोलिस निरीक्षकांसोबत बोललो असून, सर्व विद्यार्थी सुखरूप असून, ते घरी पोहोचले आहेत.” आता पुढील दोन दिवस शाळेकडून बस बंद ठेवण्यात येणार आहे. चालकाला रस्त्यांची चांगली माहिती झाल्यानंतर पुन्हा दोन दिवसांनी शाळेकडून बसेस सुरू करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. मात्र, या प्रकारामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे.