
दैनिक चालु वार्ता
पुणे प्रतिनिधी
शाम पुणेकर
पुणे :- मध्य रेल्वेच्या पुणे विभागातील कोल्हापूर, सांगली, मिरज, कराड, सातारा, बारामती या स्थानकातून ४३७ मालगाड्यांतून ११ लाख ६० हजार टन साखर वाहतूक करण्यात आली. पुणे विभागाने यावर्षी २.१३ दशलक्ष टन मालाची वाहतूक करून २७५ कोटी ३४ लाख रुपये विक्रमी महसूल मिळविला. पुणे विभागाची मालवाहतुकीतील आतापर्यंतची ही सर्वोत्तम कामगिरी आहे. यावर्षी महसूलात १११ टक्के वाढ झाली आहे.
पुणे रेल्वे विभागातून देशातील अनेक भागात ऑटोमोबाईल्स, साखर, पेट्रोलियम उत्पादने यासह विविध प्रकारच्या मालाची नियमित वाहतूक करण्यात येते. पुणे विभागाने एप्रिल २०२१ ते मार्च २०२२ या वर्षात २.१३ दशलक्ष टन मालाची वाहतूक करून २७५ कोटी ३४ लाख रुपयांचा महसूल मिळवला. गेल्या आर्थिक वर्षात १.२८ दशलक्ष टन मालाच्या वाहतुकीद्वारे १३० कोटी ४२ लाख रुपयांचा महसूल मिळाला होता.
पुण्यातील चिंचवड व खडकी स्थानकावरून ७५५८ वॅगनद्वारे ३०१ मालगाड्यांतून देशातील विविध राज्यांसह, बांग्लादेश व नेपाळमध्ये दुचाकी, चारचाकी वाहने पाठवण्यात आली. याद्वारे ४५ कोटी ५१ लाख रुपयांचा महसूल रेल्वेला मिळाला. याबाबतीत भारतात पुणे रेल्वे विभाग अव्वल ठरला आहे.