
दैनिक चालु वार्ता, वृत्तसेवा
मुंबई :- कोरोनाच्या महामारीनंतर चार महिने इंधनाच्या स्थिर दरानंतर या वर्षात पहिल्यांदा गेल्या महिन्यात २२ मार्चपासून इंधन दरवाढ सुरू झाली आहे. १६ दिवसांत १४ वेळा इंधनाची दरवाढ झाली असून, मुंबईसह राज्यभरात पेट्रोल, डिझेलच्या दराने सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे. बुधवारी पुन्हा पेट्रोल ८४, तर डिझेल ८५ पैशाने महागल्याने मुंबईकरांना उन्हाच्या चटक्यासह इंधन दराचे चटकेही सहन करावे लागत आहे.
त्यासोबतच ६ एप्रिलला मध्यरात्रीपासून सीएनजी दरात ७ रुपयांनी वाढ झाल्याने आता टॅक्सी चालकांनाही सीएनजी दरवाढीचा फटका सहन करावा लागत आहे. देशभरातील महानगरांमध्ये इंधन दरवाढ पाहिल्यास त्यामध्ये मुंबईत पेट्रोल, डिझेल दराचा उच्चांक दिसून येत आहे; तर राज्यात सर्वाधिक इंधन दराचा परभणी, नांदेड जिल्ह्यात भडका उडाला आहे. दिल्लीत पेट्रोल १०५.४१ रुपये, डिझेल ९६.६७ रुपये झाले आहे.
चंदीगढमध्ये पेट्रोल १०४.७४ रुपये, तर डिझेल ९०.९३ रुपये प्रतिलिटरवर पोहोचले. बंगळुरूमध्ये पेट्रोल १११.९ रुपये, तर डिझेल ९४.७९ रुपये झाले. चेन्नईमध्ये पेट्रोल ११०.८५ रुपये, डिझेल १००.९४ रुपये प्रतिलिटरवर पोहोचले आहे. पणजीमध्ये पेट्रोल १०६.४५ रुपये झाले असून डिझेल ९७.३३ रुपये झाले आहे. या तुलनेत मुंबईत पेट्रोल १२०.५१ रुपये, तर डिझेल १०४.७७ रुपये प्रतिलिटरवर पोहोचले आहे.
शिवाय राज्यात नांदेड, परभणी, रत्नागिरी आणि यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये पेट्रोल दराने उच्चांक गाठला आहे; तर राज्यभरात सर्वाधिक डिझेलच्या दराची नोंद नांदेड जिल्ह्यात झाली आहे. यामध्ये नांदेड जिल्ह्यात पेट्रोल १२२.९१, तर डिझेल १०५.५२ रुपये प्रति लिटरची नोंद झाली आहे. परभणी, रत्नागिरी आणि यवतमाळ जिल्ह्यात पेट्रोल १२२ रुपयांच्या पार गेले आहे.
उत्तर प्रदेशातून मुंबईत रोजगारासाठी आलो होतो. सुमारे २० वर्षे झाले, टॅक्सी व्यवसाय करत आहे. सध्याच्या महागाईमुळे पैसे शिल्लक राहत नाहीत. दिवसभरात ६ ते ७ लिटर सीएनजी लागतो. मंगळवारपर्यंत ६० रुपये दर होते. मात्र, मंगळवारी रात्री दर ७ रुपयांनी वाढल्याने आर्थिक अडचण निर्माण झाली आहे.