
दैनिक चालु वार्ता
बारामती प्रतिनिधी
निरज तांडेल
– बारामती दौऱ्यात झाले अजितदादांच्या संवेदनशीलतेचे दर्शन
बारामती, दि. १० :- बारामती दौऱ्यावर असताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी रस्ते अपघातातील जखमीला आपल्या गाड्यांचा ताफा थांबवून तातडीने मदत केली. अजितदादांनी जखमीला आपल्या ताफ्यातील गाडीने तातडीने रुग्णालयात नेण्याच्या सूचना दिल्यामुळे ‘गोल्डन आवर’मध्ये जखमीला मदत मिळाली. या प्रसंगामुळे सर्वसामान्यांना अजितदादांच्यातील संवेदनशीतेचे दर्शन झाले. या घटनेने प्रत्यक्षदर्शी नागरीक भारावून गेले. त्याचे झाले असे, रविवार दि. १० एप्रिल रोजी उपमुख्यमंत्री अजित पवार हे बारामती तालुक्याच्या दौऱ्यावर आहेत.
बारामती तालुक्यातील सुपा येथील कार्यक्रम संपवून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गाड्यांचा ताफा बारामती शहराकडे निघाला होता. या मार्गावर माळेगाव कॉलनीजवळ रस्त्यावर गर्दी जमल्याचे अजितदादांच्या लक्षात आले. त्यांनी विचारणा केली असता एका व्यक्त्तीचा नुकताच अपघात झाल्याचे त्यांना सांगण्यात आले. त्यांनी आपल्या गाड्यांचा ताफा थांबवून अपघातातील जखमीला आपल्या ताफ्यातील गाडीने तातडीने रुग्णालयात दाखल करण्याच्या सूचना दिल्या.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे खासगी सचिव हणमंत पाटील यांनी अपघातातील जखमीला रुग्णालयात दाखल केले. थोड्या वेळाने स्वत: अजितदादांनी दूरध्वनीवरुन संबंधित जखमीच्या प्रकृतीची डॉक्टरांकडून माहिती घेत, त्यांना आवश्यक ते उपचार करण्याच्या सूचना दिल्या. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी संवेदनशीता दाखवत केलेल्या तातडीच्या मदतीमुळे अपघातग्रस्ताला ‘गोल्डन आवर’मध्ये आवश्यक ते उपचार मिळाले.