
दैनिक चालु वार्ता, वृत्तसेवा
हैदराबाद :- आयपीएल 2022 मध्ये विसावा सामना राजस्थान रॉयल्स विरुद्ध लखनौ सुपर जायंट्स यांच्यात पार पडला.
या सामन्यात राजस्थान रॉयल्सने तीन धावांनी लखनौवर विजय मिळवला. या विजयात हेटमायर आणि अश्विनची भागीदारी महत्वाची ठरली. या भागीदारीनंतर आर अश्विन रिटायर्ड आउट झाला. त्यामुळे आश्विनने आयपीएल इतिहासात आपले नाव कोरले आहे. कारण अश्विन रिटायर्ड आउट होणारा पहिला फलंदाज ( Ashwin retired out first batsman ) ठरला आहे.
आयसीसीच्या नियमांनुसार, टी-२० सामन्यादरम्यान फलंदाजाला रिटायर्ड आउट केले जाऊ शकते. पण, त्याच्या रिटायर्डचे कारण पंचांना सांगावे लागेल. बॉलवर एकही धाव झाली नसताना फलंदाज त्याच्या डावात कधीही निवृत्त होऊ शकतो. या सामन्यात राजस्थानने डावाच्या 10व्या षटकात अश्विनला सहाव्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आणले होते. मात्र, याआधी रियान पराग राजस्थानमधून या नंबरवर उतरत होता. राजस्थानच्या डावातील 19व्या षटकात दोन चेंडू टाकल्यानंतर अश्विनने रिटायर्ड आउटचा निर्णय ( Ashwin’s decision to retire out ) घेतला.
त्याने 23 चेंडूत 28 धावा केल्या. अश्विनने रिटायर्ड आउट होऊन रियान परागला संधी दिली. रियानने चार चेंडूत आठ धावा केल्या. प्रथम फलंदाजी करताना राजस्थानने सहा विकेट्स गमावून 165 धावा केल्या होत्या. अश्विनने पॅव्हेलियनमध्ये परतण्याचा निर्णय घेतला, तेव्हा शिमरॉन हेटमायर दुसऱ्या टोकाला होता.
रिटायर्ड आउट म्हणजे काय? जेव्हा एखादा फलंदाज पंच किंवा विरोधी संघाच्या कर्णधाराशी सल्लामसलत न करता, डाव मध्येच सोडून मध्यभागी पॅव्हेलियनला जातो, तेव्हा त्याला रिटायर्ड आउट मानले जाते.
नियमानुसार तो विकेट मानला जातो. एकदा फलंदाज रिटायर्ड आउट झाल्यावर तो पुन्हा फलंदाजीला येऊ शकत नाही. दुसरीकडे, रिटायर्ड हर्टचा फलंदाज संघाच्या आवश्यकतेनुसार पुन्हा फलंदाजीसाठी मैदानात उतरू शकतो.
अश्विन योग्य वेळी रिटायर्ड आउट झाला : संगकारा
राजस्थान रॉयल्सचे क्रिकेट संचालक कुमार संगकाराचे ( RR Cricket Director Kumar Sangakkara ) मत आहे की, रविचंद्रन अश्विनने लखनौ सुपर जायंट्सविरुद्ध योग्य वेळी रिटायर्ड आउट घेऊन सामन्याची परिस्थिती चांगल्या प्रकारे हाताळली. पण रियान परागला रासी व्हॅन डर डुसेनच्या अगोदर न पाठवणं ही चूक असल्याचं त्याने मान्य केलं. आयपीएलच्या इतिहासातील राजस्थान हा पहिला संघ ठरला, ज्याने रिटायर्ड आउट रणनीती स्वीकारली. रविवारी लखनऊविरुद्धच्या सामन्यात अश्विन 28 धावांवर खेळत असताना तो स्वतः पॅव्हेलियनमध्ये परतला.