
दैनिक चालु वार्ता
अमरावती प्रतिनिधी
श्रीकांत नाथे
अमरावती :- जिल्ह्यात नियमित आरोग्य सेवा देणाऱ्या वैद्यकीय अधिकाऱ्यांचे वेतन पाच महिन्यांपासून प्रलंबित असल्यामुळे वैद्यकीय अधिकाऱ्यांतर्फे आरोग्य विभागाला निवेदन देऊन संप आंदोलनाचा इशारा दिला.या बाबीची तत्काळ दखल घेऊन जिल्ह्याच्या पालकमंत्री श्रीमती ॲड.यशोमती ठाकूर यांनी घेऊन शासन स्तरावर पाठपुरावा केला.त्यामुळे जिल्ह्याला ४ कोटी ३० लक्ष रुपयांचा निधी प्राप्त झाला असून लवकरच हे वेतन अदा करण्यात येईल असे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.दिलीप रणमले यांनी सांगितले.
प्राथमिक आरोग्य केंद्र,उपकेंद्र येथील स्थायी व अस्थायी नवनियुक्त वैद्यकीय अधिकाऱ्यांचे वेतन काही महिन्यांपासून प्रलंबित होते.त्यामुळे या अधिकाऱ्यांनी आरोग्य विभागाला निवेदनाद्वारे संप आंदोलनाचा इशारा दिला.या बाबीची माहिती मिळताच पालकमंत्र्यांनी अतिरिक्त मुख्य सचिव डॉ.प्रदीप व्यास,संचालक डॉ.अर्चना पाटील यांच्याशी चर्चा केली व वैद्यकीय अधिकाऱ्यांचे वेतन तत्काळ अदा करण्याचे निर्देश दिले. त्यामुळे आरोग्य विभागाकडून सर्व नवनियुक्त वैद्यकिय अधिकाऱ्यांचे नोव्हेंबर ते मार्च अशा पाच महिन्यांच्या वेतनाचे अदा करण्यासाठी ४ कोटी ३० लक्ष रुपये तात्काळ मंजूर करण्यात आला.
हा निधी जिल्ह्याला प्राप्त झाला आहे अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी दिली. या निधीद्वारे संबंधित वैद्यकीय अधिकाऱ्यांचे वेतन तत्काळ अदा करण्यात यावे.यापुढे कधीही वैद्यकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांचे वेतन प्रलंबित राहता कामा नये असे स्पष्ट निर्देश पालकमंत्र्यांनी दिले आहेत.