
दैनिक चालु वार्ता, वृत्तसेवा
मुंबई :- आयपीएलच्या पंधराव्या हंगामात खराब सुरुवात करणाऱ्या हैदराबादच्या संघानं (SRH) पुनारागमन केलं आहे. पहिल्या दोन सामन्यात पराभव स्वीकारल्यानंतर हैदराबादच्या संघानं मागील दोन सामन्यात विजय मिळवला आहे.:मात्र, याचदरम्यान, हैदराबादच्या संघाला मोठा धक्का देणारी माहिती समोर आलीय. हैदराबादच्या संघाचा स्टार फिरकी गोलंदाज वॉशिंग्टन सुंदरला दुखापत झाली आहे. ज्यामुळं त्याला पुढील काही सामन्यात खेळता येणार नाही. त्याला दुखापतीतून सावरल्यानंतरच संघात पुनरागमन करता येणार आहे. या हंगामात वॉशिंग्टन सुंदर चांगल्या फॉर्ममध्ये दिसत होता.
वॉशिंग्टन सुंदरच्या हाताला दुखापत
आयपीएलच्या 21 सामन्यात हैदराबाद आणि गुजरात यांच्यात जोरदार टक्कर झाली. या सामन्यात हैदराबादच्या संघानं आठ विकेट राखून गुजरातच्या संघाचा विजयी रथ रोखला. दरम्यान, गुजरातच्या डावात वाशिंग्टन सुंदरला दुखापत झाली. त्यानंतर त्यानं मैदान सोडलं. सुंदरला केवळ तीन षटके टाकता आली. तो मैदानाबाहेर गेल्यानंतर त्याऐवजी एडन मार्करामनं त्याची ओव्हर पूर्ण केली.
टॉम मूडी काय म्हणाले?
हैदराबादचे मुख्य प्रशिक्षक टॉम मूडी यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं की, “वाशिंग्टन सुंदर किमान 1-2 आठवडे संघाबाहेर असू शकतो. गुरजरात विरुद्ध सामन्यात वॉशिंग्टन सुंदरच्या उजव्या हाताला दुखापत झाली . आम्ही पुढील दोन-तीन दिवस त्यावर लक्ष ठेवणार आहोत. त्याला या दुखापतीतून सावरण्यासाठी दोन आठवड्यांचा कालावधी लागू शकतो.”
वॉशिंग्टन सुंदरच्या जागी कोणाला संधी मिळणार?
या मोसमात वॉशिंग्टन चांगलाच फॉर्मात आहे. पॉवरप्लेमध्ये विकेट घेण्याचा पर्याय असण्यासोबतच तो क्रमवारीत फलंदाजीतही चांगले योगदान देत होता. त्याच्या अनुपस्थितीत, आता हैदराबादला त्यांचे संयोजन बदलावं लागू शकते. श्रेयस गोपाल आणि जगदीश सुशीथ यांचा प्लेइंग इलेव्हनमध्ये समावेश केला जाऊ शकतो.