
दैनिक चालु वार्ता, वृत्तसेवा
मुंबई :- शिवसेना नेते संजय राऊत यांनी आयएनएस विक्रांतसाठी गोळा केलेल्या मदतनिधीत भारतीय जनता पार्टीचे नेते सोमय्यांनी घोटाळा केल्याचा आरोप केला आहे. दरम्यान, कालपासून सोमय्या यांच्याशी संपर्क होऊ शकत नव्हता. त्यावेळी सोमय्या कुठे गेले? सोमय्या यांना केंद्र सरकारने सुरक्षा दिली असताना सोमय्यांचा शोध कसा लागत नाही, असे सवाल केले जात होते. त्यादरम्यान, राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
ते म्हणाले, सोमय्या यांना सरकारी सुरक्षा असताना ते कुठे आहेत याचे उत्तर सरकारलाच विचारू, असे पाटील म्हणाले आहेत. त्यामुळे सोमय्यांना शोधण्यासाठीही महाविकास आघाडीला केंद्र सरकारवरच अवलंबून राहावं लागत आहे, हे यातून स्पष्ट झाले आहे.
काल किरीट सोमय्या यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळण्यात आला आहे. राज्य सरकारने न्यायालयात या कथित आरोपात किरीट सोमय्या आणि नील सोमय्या यांना ताब्यात घेऊन चौकशी करण्याची गरज असल्याचे सांगितले आहे.
सोमय्यांनी या घोटाळा प्रकरणाचे स्पष्टीकरण दिले आहे. ते म्हणाले, या कथित घोटाळा प्रकरणी मी उच्च न्यायालयात दाद मागणार आहे. फक्त संजय राऊत यांच्या एका विधानावरून तक्रार दाखल करण्यात आली आहे. राऊतांनी याबाबत एकही पुरावा सादर केलेला नाही. संजय राऊत यांनी माझ्यावर खोटे आरोप केले आहेत, असेही सोमय्या यांनी म्हटले आहे.