
दैनिक चालु वार्ता, वृत्तसेवा
नवी दिल्ली :- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे भाजपच्या कर्नाटकातील मंत्र्यांच्या भ्रष्टाचाराची तक्रार करणाऱ्या संतोष पाटील यांचा मृतदेह आढळून आल्यानेे खळबळ उडाली आहे.
त्यावरून आता राजकारण तापलं आहे. पाटील हे कंत्राटदार असून त्यांनी ग्रामविकास व पंचायत राज मंत्री के. एस. ईश्वरप्पा (K. S. Eshwarappa) यांच्यावर गंभीर आरोप केले होते. त्यामुळे आता ते अडचणीत आले असून काँग्रेसने (Congress) त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.
पाटील हे कंत्राटदार असून हिंदू युवा वाहिनीचे राष्ट्रीय सचिवही आहेत. उडपी येथील एका हॉटेलमध्ये मंगळवारी त्यांचा मृतदेह आढळून आला आहे. ही आत्महत्या असल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. मागील काही दिवसांपासून ते बेपत्ता होते. बेळगावी पोलिसांकडून त्यांचा शोध घेतला जात होता. दरम्यानच्या काळात पाटील यांनी त्यांच्या मित्रांना मेसेज केला होता. ईश्वरप्पा हे आपल्या मृत्यूला कारणीभूत असतील, त्यांना शिक्षा झाली पाहिजे, असं पाटील यांनी म्हटलं होतं.