
दैनिक चालु वार्ता, वृत्तसेवा
नवी दिल्ली :- उत्तर प्रदेशासह पाच राज्यांच्या निवडणुका होताच पंतप्रधान नरेंद्र मोदी व गृहमंत्री अमित शहा यांच्या नेतृत्वाखालील भाजपने हिमाचल प्रदेश, व गुजरात विधानसभा निवडणुकांची तयारी सुरू केली आहे. याच मालिकेत आगामी काळात मोदी मंत्रिमंडळातही फेरबदलाच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. या दोन राज्यांबरोबरच भाजपला सलग दुसऱयांदा साथ देणारा व लोकसभेची चावी मानला जाणारा उत्तर प्रदेश, आगामी मुंबई महापालिका निवडणुका व राज्यात पुन्हा भाजपची सत्ता आणण्याची दिल्लीची महत्वाकांक्षा पहाता या संभाव्य विस्तारात मुंबई-महाराष्ट्रालाही महत्वाचे स्थान मिळण्याचे संकेत आहेत. टीम मोदीमधील काही मंत्र्यांना घरी बसावे लागण्याची चिन्हे आहेत.
राजकीय वर्तुळातील हालचाली पहाता गुजरात, हिमाचल प्रदेश बरोबरच काही मराठी नावेही ‘टीम मोदी’बरोबर जोडली जाण्याची चिन्हे आहेत. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार मुंबई भागातील एक खासदार, भाजप महिला मोर्चाच्या माजी राष्ट्रीय अध्यक्षा विजया रहाटकर व राष्ट्रीय कार्यकारिणीचे सदस्य विनोद तावडे व राज्यातील एका अल्पसंख्यांक नेत्याची वर्णी टीम मोदीमध्ये लागण्याची शक्यता आहे. तावडे यांची दिल्लीत बदली केली तरी त्यांनी हरियाणाची जबाबदारी तेवढ्याच निष्ठेने सांभाळली हा त्यांचा ‘प्लस पॉईंट’ ठरू शकतो. भाजपच्या राष्ट्रीय मुख्यालयात तावडे यांना जे कार्यालय देण्यात आले आहे ते पाहिले तरी राष्ट्रीय पातळीवरील त्यांच्या वाढणाऱया, विस्तारणाऱया जबाबदाऱयांची जाणीव होते. रहाटकर याचं स्थान केंद्रीय निवडणूक समिती या भाजपमधील क्र.२ च्या महत्वाच्या मंडळात अबाधित आहे.