
दैनिक चालु वार्ता, वृत्तसेवा
मुंबई :- राज्यात मशिदीवरील भोंग्यावरून सुरू असलेल्या वादाविषयी बोलताना पर्यावरण व पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना टोला लगावला. ‘मशिदीवरील भोंग्यातून पेट्रोल डिझेलच्या किमती का वाढल्या ते देखील एकदा लोकांना सांगावे’, असे आदित्य ठाकरे यांना पत्रकारांशी बोलताना सांगितले.
3 मेपर्यंत मशिदीवरील भोंगे उतरवा अन्यथा देशभरातील ज्या मशिदींवर भोंगे दिसतील तिथे हनुमान चालिसा वाजवण्यात येईल, असे मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी बुधवारी ठाण्यातील सभेत सांगितले. त्यांच्या या आवाहनाविषयी बोलताना आदित्य ठाकरे यांनी चांगलाच टोला लगावला. ‘यावर जास्त टिप्पणी करण्यापेक्षा भोंग्यातून वाढलेल्या किंमतीबद्दल सांगता आलं तर ते पण सांगावं. पेट्रोल डिझेल, सीएनजीची दरवाढ का झाली ते सांगावं. गेल्या साठ वर्षात का झालं ते नाही तर गेल्या दोन तीन वर्षात का झालं ते सांगावं’, असा सणसणीत टोला आदित्य ठाकरे यांनी लगावला आहे.
मशिदीवरील भोंगे हा धार्मिक नव्हे तर सामाजिक विषय आहे. सणावारी समजू शकतो, पण 365 दिवस लाऊडस्पीकर का ऐकवता असे सांगतानाच 3 मेपर्यंत मशिदीवरील भोंगे उतरवा अन्यथा देशभरातील ज्या मशिदींवर भोंगे दिसतील तिथे हनुमान चालिसा वाजवण्यात येईल, असे मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ठाण्यातील सभेत सांगितले.