
दैनिक चालु वार्ता, वृत्तसेवा
मुंबई :- अखंड भारताचे स्वप्न पुढील १०-१५ वर्षात पूर्ण होईल हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (RSS) सरसंघचालक मोहन भागवत यांनी केलेले वक्तव्य नवे नसून RSS चा तोच अजेंडा आहे. केंद्रात आरएसएसच्या विचाराचे सरकार आल्यापासून देशभर विष कालवून समाज तोडण्याचे काम सुरु आहे अशा पद्धतीने देश तोडून अखंड भारत कसा साकार होईल? असा सवाल महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी उपस्थित केला आहे.
प्रसार माध्यमांशी बोलताना नाना पटोले म्हणाले की, सरसंघचालक मोहन भागवत यांनी अखंड भारताबद्दल केलेल्या विधानाचे आश्चर्य वाटण्याचे कारण नाही. आरएसएसची विचारधारा तोडणारी आहे यातूनच सामाजिक वातावरण बिघडवण्याचे काम केले जाते. त्यासाठी सातत्याने धर्मा-धर्मात वाद निर्माण करणारे मुद्दे उपस्थित केले जात आहेत. केंद्रात त्यांच्याच विचारांचे सरकार असल्याने समाजात विद्वेष पसरवणाऱ्या घटनांना बळ मिळत आहे. परंतु अखंड भारताचे स्वप्न बाळगणाऱ्या आरएसएसने या अखंड भारताचे व्हिजन काय? अखंड भारतात कोणत्या-कोणत्या धर्माला, जातींना स्थान असेल हे स्पष्ट करायला हवे, असे नाना पटोले यांनी म्हटले आहे.