
दैनिक चालु वार्ता
गंगापूर प्रतिनिधी
सुनिल झिंजुर्डे पाटिल
गंगापूर :- पहिल्या टप्प्यात साधारणपणे मे महिन्यात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग वाहतुकीसाठी खुला करण्याच्या हालचाली सुरू आहेत. यानिमित्त नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी आज समृद्धी महामार्गाची हेलिकॉप्टरद्वारे पाहणी केली. नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे आज औरंगाबाद दौऱ्यावर आहेत. त्यांनी महामार्गाची हेलिकॉप्टरद्वारे पाहणी केली. मुंबईपासूनच ते समृद्धी महामार्गाच्या समांतर हवाई मार्गाने आले. त्यानंतर गंगापूर आणि वैजापूर तालुक्यांच्यामध्ये समृद्धी महामार्गावर मंत्री शिंदे यांचे हेलिकॉप्टर उतरवलं. विशेष म्हणजे, पहिल्यांदाच समृद्धी महामार्गावर हेलीपॅडची व्यवस्था करण्यात आली. त्यांनी महामार्गावर उतरून पाहणी केली.
महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांना जोडणारा बहुचर्चित आणि महत्त्वाकांक्षी असलेल्या या महामार्गाचा पहिला टप्पा नागपूर ते सेलूबाजार आणि जालना ते शिर्डी पूर्णपणे तयार आहे. औरंगाबाद जिल्ह्यातून १२० किलोमीटर लांबीचा हा महामार्ग जात असून, सावंगी, माळीवाडा, हडस पिंपळगाव व जांबरगाव या चार ठिकाणी इंटरचेंजेस उभारण्यात आले आहेत, तर सावंगीच्या पूर्वेला पोखरीजवळ बोगदा उभारण्यात आला आहे. पुढे जटवाड्याजवळ डोंगर कापून हा रस्ता गेला आहे. दुसऱ्या बाजूला जाण्यासाठी वन्यप्राण्यांना अडथळा येऊ नये, विनाव्यत्यय त्यांचा वावर व्हावा, यासाठी या महामार्गावर दोन ‘वाईल्ड लाईफ ओव्हरपास’ व दोन ‘अंडरपास’ तयार करण्यात आले आहेत.