
दैनिक चालु वार्ता
संतोष मानधरने
देगलूर प्रतिनिधी
देगलूर :- शेवाळा येथे भारतीय सैन्यातून निवृत्त होऊन आलेले सुभेदार संतोष पाटील केंचे यांचा भव्य स्वागत सत्कार गावाकऱ्यांच्या वतीने करण्यात आले आणि त्यांची भव्य मिरवणूक गावभर (जूणे शेवाळा – नवीन शेवाळा) काढण्यात आली. या सोहळ्याच्या आयोजन ग्रामपंचायत शेवाळा व समस्त शेवाळयातील गावकऱ्यांनी पुढाकार घेऊन सम्पन्न केले . कार्यक्रमाला गावाचे सरपंच प्रतिनिधी व गावातील सर्व प्रतिष्ठित नागरिक, जेष्ठ नागरिक, नवतरुण मंडळी, लहान मुले, महिला आघाडी असे असंख्य गावातील नागरिक उपस्थित होते. गाव शेवाळा ता.देगलूर येथील भूमिपुत्र सुभेदार संतोष पाटील केंचे साहेब भारतीय थल सेना मध्ये सैनिक ते सुभेदार या पदावर 26 वर्ष भारत मातेची सेवा करून सेवानिवृत्त झाले.
शिक्षक परिवारात जन्माला येऊन कठीण प्रसंगाला धैर्याने तोंड देण्याचा वसा त्यांना त्यांच्या वडिलांकडून मिळाला.तर मायेची उब कशी धरावी हे त्यांना त्यांच्या आईकडून मिळाले.घरात आई- वडील एक भाऊ अशोकराव,पाच बहीण असा मोठा परिवार आहे. साहेबांचे पहिलीपासून ते सातवीपर्यंतच शिक्षण प्राथमिक शाळा शेवाळा तर आढवीपासून ते बारावीपर्यंतच शिक्षण श्री छत्रपती शिवाजीमहाराज हायस्कूल व ज्युनियर कॉलेज सगरोळी येथे झाले. शिक्षणाबरोबरच इतर कार्यामध्ये त्यांचा सहभाग उत्साहाचा असायचा जसे की शाळा-कॉलेजमध्ये असताना स्काऊट गाईड , एन.सी.सी मध्ये अवर्जून सहभाग असायचा. यामुळे साहेबांचा मनात , देश प्रेम, देश सेवा आणि राष्ट्रीय भावना निर्माण झाली.
मजबूत देहयष्टी व त्यांच्या देशप्रमी मनाला नेहमी असे वाटायचे की, अंगावर कोणतीतरी अधिकारी वर्दी असली पाहिजे. बारावी नंतर त्यांनी बीए प्रथम वर्षासाठी श्री लालबहादूर शात्री महाविद्यालयात धर्माबाद येथे प्रवेश घेतला. संतोष केंचे साहेब रेल्वे पोलीस, महाराष्ट्र पोलीस, दिल्ली पोलीस या भरतीसाठी प्रयत्न करू लागले. त्यात साहेबांना यश आल आणि दिल्ली पुलिस मध्ये 1995 ला निवड करण्यात झाली परंतु आईच्या मायेने त्यांना रोखल. मग साहेबांनी भारतीय सैन्य दलात भरती होण्यासाठी औरंगाबाद येथे गेले वयाच्या अवघ्या 19 वर्षे आठ दिवस वयात ते आर्मी मेडिकल कोर मध्ये भरती झाले. सैनिक पदावर रुजू होण्यासाठी बोलावणं आलं.
त्याकाळी गावातून तालुक्यालाही एकट्याला पाठवायला आई-वडील तयार नसत, पण देशसेवेसाठी आपला मुलगा जातो या आनंदमयी क्षणाने आई-वडिलांनी आपल्या वीराला सैन्य दलात जाण्याची परवानगी दिली. मग तो दिवस उजाडला दिनांक 07 मार्च 1996 रोजी साहेब आर्मी मेडिकल कोर सैनिक पदावर लखनऊ (उत्तर प्रदेश) येथे रुजू झाले. जवळपास एक वर्षाच्या खडतर प्रशिक्षणानंतर दिनांक 07 मे 1997 रोजी भारतीय तिरंगा च्या ध्वजासमोर शपथविधी झाला. येथूनच खऱ्या अर्थाने देशसेवेला सुरुवात झाली. ट्रेनिंग सेंटर लखनऊ, दिल्लीत प्रशिक्षण पूर्ण केले. पहिली पोस्टिंग अम्बाला, जम्मू-कश्मीर, गुजरात, महाराष्ट्र, सिक्कीम, पश्चिमबंगाल, राजस्थान परत जम्मू काश्मीर, एन सी सी आजमगढ येथे प्रशिक्षक आणि त्यांच्या खडतर सेवेची दखल घेऊन त्यांची यूनाइटेड नेशन शांतीसेनेत (साउथ सूडान) निवड झाली अशा अनेक ठिकाणी त्यांनी आपली सेवा बजावली.
त्याच बरोबर सैनिक, नायक, हवालदार, नायबसुभेदार, सुभेदार ह्या पदापर्यंत त्यांनी झेप मारली. सैनिक ते सुभेदार या यशस्वी प्रवासाच्या दरम्यान देशसेवा करत असताना त्यांना त्यांच्या आई वडिल पत्नी, भाऊ व परिवाराची मोलाची साथ मिळाली. घरची परिस्थिती सर्व सुख-संपत्ति असतानाही आपला मुलगा देशसेवेसाठी गेला पाहिजे ही वडिलांची इच्छा असल्यामुळे संतोष यांचे वडील बाबुराव यांनी देशसेवेसाठी पाठवले. त्याचबरोबर त्यांचे मोठे भाऊ अशोकराव पाटील आपला भाऊ देश सेवेसाठी जात असताना त्यांना कुठल्याच प्रकारची गावाकडची अडचण कधीच भासू दिली नाही. याचा संतोष केंचे साहेब हे आवर्जून उल्लेख करतात. कारण सीमेवर देशरक्षणासाठीच्या सर्व जबाबदाऱ्या पार पाडत असताना त्यांच्या कुटुंबाची मुख्य जबाबदारी त्यांचे वडील व भावाने अगदी सक्षमपणे सांभाळली.
नव्या पिढीसाठी बोलताना ते म्हणतात की, आपले ध्येय गाठण्यासाठी सातत्याने प्रयत्न करीत राहा प्रयत्नवादी बना. प्रामाणिक प्रयत्न करताना कितीही वाईट प्रसंग आले तरी ध्येय पूर्ण होईपर्यंत थांबू नका. हे स्वतःच्या अनुभवाने सांगतात. त्याच बरोबर स्वामी विवेकानंद यांनी सांगितले आहे की युवा शक्ति मधेच इतक्या शक्ती उपस्थित आहेत की तो ब्रह्मांडातील कोणतीही गोष्ट मिळवु शकतो. प्रत्येक युवकाला आपल्या ध्येयाच्या मागे पूर्ण प्राण पणाला लावून लागा, आणि जोपर्यंत ध्येय मिळत नाही तोपर्यंत कुठेही थांबू नका . कोणतेही कार्य करा पण गुणवत्ता पूर्ण करा, ज्या क्षेत्रात तुम्ही जाल त्यात जीव ओता, त्यात सर्वोच्च स्थानी पोहचा मातृभूमीची सेवा ही सर्वश्रेष्ठ सेवा आहे. हा विचार त्यांच्या नसानसात भिनलेला आहे. म्हणूनच सेवानिवृत्तीनंतर सुद्धा स्वस्थ न बसता सैन्यात भरती होऊ इच्छिणार्या तरुणांना लागेल ती मदत व योग्य ते मार्गदर्शन आणि सामाजिक कार्य करण्याचा त्यांचा मानस आहे.
ग्रामीण भागातील शिक्षकी कुटुंबातील मुलगा सैन्यदलात सैनिक या पदावर रुजू होतो. आणि सैन्यातील बरेचसे कठीण टप्पे पार करत सुभेदार या पदापर्यंत पोहोचतो. ही गोष्ट तुमच्या आमच्यासाठी खरंच खूप प्रेरणादायी आहे. अशा या भारतमातेच्या वीरास त्यांच्या पुढील आयुष्यासाठी त्यांना हार्दिक शुभेच्छा देण्यात आले. या शुभ कार्य प्रसंगी गावातील सर्व प्रतिष्ठित नागरिक तसेच शेवाळा गावचे सरपंच श्री शिवकुमार पाटील, उपसरपंच बालाजी वन्नलवार, पो.पा शांतेश्र्वर पाटील भालेवार, प्रकाश पाटील, दिलीप पाटील, नागनाथ पा भालेवार, मोहन पा आरसेवार, राम पा, समदान देशमुख, बसंवत पाटील केंचे, सचिन आ पाटील, रोशन केंचे व बालाजी वन्नलवार, नागनाथ वन्नलवार आणि गावातील सर्व नागरिक व मित्र मंडळी उपस्थित राहून हा सोहळा यशस्वी करण्यात आले.
याप्रसंगी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार श्री संभाजी पाटील (जि प केंद्र प्रमुख आलूर), सुरेश भालेराव, सायबू पेंडाळे यांनी केले. सोहळ्याचे सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली.