
दैनिक चालु वार्ता
इंदापूर प्रतिनिधी
बापु बोराटे
■ सुशोभीकरणाचे श्रेय भाजपला
■ इतरांनी श्रेय घेऊ नये
इंदापूर :- भाजपचे तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकाळातील मंजूर श्री क्षेत्र निरा नरसिंहपूर तीर्थक्षेत्र विकास आराखडा रु.२६०.८६ कोटीच्या निधीतून इंदापूर-अकलूज-सांगोला रस्त्यांवरील इंदापूर शहरातील विविध ७ चौकांची सुशोभीकरणाची कामे करण्यात आली आहेत. त्यामुळे इतरांनी या चौकांच्या सुशोभीकरणाचे श्रेय घेण्याचा केविलवाणा प्रयत्न करू नये, असा टोला भाजपचे इंदापूर शहराध्यक्ष शकील सय्यद यांनी आज रविवारी ( दि.१७) लगावला. शहरातील विविध चौकांच्या सुशोभीकरणाचे उद्घाटन आज रविवारी खासदार, मंत्री यांच्या हस्ते होत आहे. त्या पार्श्वभूमीवर भाजपचे शहराध्यक्ष शकील सय्यद यांनी या चौकांच्या विकास कामांची संकल्पना भाजप सरकारची असल्याचे स्पष्ट केले.
ते म्हणाले, पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग शासन निर्णय क्र. बैठक २०१६/३ /प्र. क्र.२०२/ पर्यटन दि.१६/११/२०१६ शासन निर्णयातील श्री क्षेत्र निरा नरसिंहपूर तीर्थक्षेत्र विकास आराखडा रु.२६०.८६ कोटी या आराखड्यातील मार्गदर्शक सूचनांनुसार इंदापूर-अकलूज-सांगोला रस्त्यांवरील विविध सात चौकांचे सुशोभीकरण व रस्त्यावरील विद्युत खांबांचे स्थलातर, पथदिवे बसविणे, पाईपलाईन दुरुस्ती आदी कामांसाठी निधी मंजूर करण्यात आला, त्यामुळे या कामांचे श्रेय पूर्णपणे माजी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडवणीस व भाजप सरकारला आहे, असे शकील सय्यद यांनी स्पष्ट केले. इंदापूर शहरामध्ये गाजावाजा करीत सध्याचे सत्तारूढ नेते सुशोभीकरणाच्या कामांचे उद्घाटन करणार असून त्याची मोठी जाहिरात केली आहे.
वास्तविक पाहता चौकांचे सुशोभीकरणाची कामे ही श्री क्षेत्र नीरा नरसिंहपूर विकास आराखड्यानुसार झाली असून, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ती कामे मंजूर केली आहेत. इंदापूर नगरपरिषद ही राज्याचे माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या नेतृत्वाखाली गेली २० वर्षे कार्यरत असून, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांचे नेतृत्वाखाली नगरपालिकेने सन २०१६ पासून इंदापूर शहरातील चौकांच्या सुशोभीकरणासाठी व विकास कामांकरीता शासन दरबारी पाठपुरावा केला, त्यामुळे चौकांच्या सुशोभीकरणाची कामे होऊ शकली, असे भाजप शहराध्यक्ष शकील सय्यद यांनी नमूद केले. यावेळी गटनेते कैलास कदम उपस्थित होते.
चौक हस्तांतरणासाठी हर्षवर्धन पाटील हे देवेंद्र फडणवीसांना भेटले!
इंदापूर शहरातील सदरचे चौक हे नगरपालिका कार्यक्षेत्रात असल्याने सुशोभिकरणाचे कामास मंजुरी मिळणेस अडचण येत होती. त्यामुळे माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, भरत शहा हे तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सन २०१६ मध्ये भेटले व सदरचे चौक नगरपालिकेकडून बांधकाम विभागाकडे हस्तांतरित करण्यात आले. त्यामुळेच चौकांचे सुशोभीकरण होऊ शकले, अशी माहिती भाजपचे शहराध्यक्ष शकील सय्यद यांनी दिली.