
दैनिक चालु वार्ता
इंदापूर प्रतिनिधी
बापु बोराटे
इंदापूर :- मला एक कळत नाही. बरेच जण जॉब पोस्ट करताना आपल्या कंपनीचे नाव सांगत नाहीत. फक्त संपर्क नंबर देतात. (का रे…??? लाज वाटते का तुम्हाला तुमच्या कंपनीचे नाव घ्यायला..?? की आपली फसवेगिरी कुणाला कळू नये म्हणून लपवता.?) मग त्यांना कॉल केला की ते देतील त्या पत्त्यावर जायचं. तिथे मग एन्ट्री फी द्यायची आणि ३-४ तास आळस देत बळजबरीने बसायचं. मग ते शेवटच्या ५ मिनिटात सांगणार. ५,०००/- ते १६,०००/- पैकी एखादा आकडा सांगणार एवढे पैसे भरा आणि आपली आयडी बनवा, आमची मेंबरशिप घ्या आणि आयुष्यभर लाखो कमवा काय रे पैसा गरीब मुलांचा त्यांच्या आई-बापानी कष्टाने कमावलेला आणि त्यांच्या जीवावर तुम्ही उड्या मारता, जॉब देतो म्हणून विद्यार्थ्यांना लुटता तुम्हाला लाज नाही वाटत कष्टाचा पैसा लुबाडायला..??
हे धंदे बंद करा जॉब देणार असाल तर जॉब द्या. पण हे डायरेक्ट सेलिंग कम्पनी आहे, तुम्ही महिन्याला लाखो कमावणार असे खोटे बोलणे बंद करा. तुम्ही चोरांपेक्षा कमी नाही आहात समजलात का भामट्यानो काही कंपन्या गारमेंटच्या नावाने धंदा करतात. १५,०००/- ते ३५,०००/- भरा आणि आमच्या कंपनीचे १०%, २०% भागीदारी मिळवा बोलतात आणि इथेच माझा भाऊ, माझी बहीण फसते पैसे भरते. पण कसलं काय अन कसलं काय तेल ही गेले तूप ही गेले. अन हाती राहीले लाटणे अशी गत होते आणि त्यांना आपण पैसे भरतो ते पैसे त्यांच्या साखळी पद्धतीने सर्वांना वाटून येतात. काही कंपन्या विदेशी नोकरी देतो म्हणत लाखो रुपये लुटतात.
माझा गरजू अन शिकलेला भाऊ, माझी बहीण पुन्हा इथेच फसते. आई-बाप कर्ज काढून पोरगा परदेशी नोकरीला जाणार, पोरगी विमानाने परदेशात नोकरीला जाणार म्हणून पैसे भरतात. ३ काय ४ काय अहो ५,००,०००/- ते १०,००,०००/- भरतात. अन ही शिकलेली पोरं विमानाने परदेशी जातात. पण तिथे कोणीच नसत. बऱ्याच वेळानी पोलीस मात्र येतात अन यांना पुन्हा भारतात पाठवतात. पण तेव्हा ती कंपनी तिथे नसते. त्यांची फारशी माहिती ही नसते अन त्यांचे नंबर ही बंद असतात.
पैसे घेऊन लुटणाऱ्या आणि लुटायला भाग पडणाऱ्या या सगळ्या फ्रॉड कंपन्या आहेत. एकदा आपण फसलो की दुसऱ्यांना फसवण्याशिवाय गत्यंतरच नाही ना पैशासाठी करावेच लागते विद्यार्थ्यांना कारण आई-बापाचे कष्टाचे पैसे जे दिलेत या भामट्याना म्हणजे कसं हम भी डुबे है और तूमको भी डुबाऐंगे म्हणून शक्यतो जॉबशी रिलेटेड पोस्ट आली तर त्या व्यक्तीला कंपनीचे प्रोफाइल विचारा आणि गूगल वरती सर्च करून खात्री करून घ्या.