
दैनिक चालु वार्ता
मंठा प्रतिनिधी
मंठा :- येथील श्री रेणुका माता देवीचे चैत्र पौर्णिमा यात्रा महोत्सवास प्रारंभ झाला आहे.यात बारागाड्या व टिपरखेळी महोत्सव [ता.१६] शनिवार रोजी पार पडला.या दोन दिवसीय यात्रा महोत्सवात स्थानिक तसेच तालुक्यातील व बाहेरगावाचे भाविक चैत्र पौर्णिमेच्या यात्रेला मुद्दाम येऊन नवस फेडण्यासाठी मोठी गर्दी केली होती. चैत्र पौर्णिमेनिमित्त सकाळी लवकर देवीचा अभिषेक करून देवीच्या तांदळ्याला साडी चोळी व दागिने घालून सजविल्या जातो. दुपारी नवशिकांनी नवसाच्या बारागाड्या ओढून नवस फेडला.
तर चैत्र पौर्णिमेच्या अगोदर रामनवमी पासून देवीची टिपर खेळी सुरू करण्यात आली होती.ही टिपर खेळी मानाची काठी श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरापासुन हलगीच्या तालावर पारंपारिक नृत्य खेळत देवी मंदिरा पर्यंत पोहोचली.यावेळी देवीची छबिणा मिरवणूककाढण्यात आली. समोर पोत, टिपर खेळ खेळत नवसाचे भांदे फोडल्या. यावेळी सदानंदीचा उदो उदो , आई उदे ग आंबे उदे चा जयघोष करून देवी मंदिरास पाच प्रदक्षिणा मारल्या जातात. कोरोना काळात गेली दोन वर्ष यात्रा किंवा देवी मंदिरात कोणतेही सार्वजनिक, धार्मिक, सण उत्सव झाले नाही.
त्यामुळे अनेक भाविकांचा नवस फेडायचा राहुन गेला असून शनिवारी ( ता. १६ ) चैत्र पौर्णिमेच्या यात्रेकरिता तालुक्यात बाहेरून येणाऱ्या पाहुणे व नातेवाईक यांची वर्दळ वाढली आहे. दोन दिवस भरणार्या यात्रेत पान फूल, प्रसाद याबरोबरच रहाट पाळणे, लहान मुलाचे खेळणे, सौंदर्यप्रसाधने, चहा फळाचे दुकान, हॉटेल आदी व्यवसायिक दुकाने थाटण्यात आली आहे. मागील दोन वर्षे कोरोनामुळे व त्यापूर्वी दोन वर्ष वादळी वारा व पावसामुळे छोट्या व्यापाऱ्यांचे मागील चार वर्ष खूप नुकसान झाले आहे. या वर्षी तरी यात्रेत भरपूर ग्राहकी होऊन चांगले उत्पन्न मिळेल अशी आशा बाळगून व्यापारी यात्रेत दुकाने थाटली आहेत.