
दैनिक चालु वार्ता
प्रतिनिधी आर्णी
श्री. रमेश राठोड
आर्णि :- सावळी सदोबा कै. वसंतराव नाईक शेतकरी स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष श्री.( राज्यमंत्री दर्जा प्राप्त ) मा. श्री. किशोरभाऊ तिवारी यांनी दिनांक १७ एप्रिल रविवार रोजी आयता व उमरी ( काप ) येथे भेट देऊन तेथील विविध समस्या, अडचणी यावर चर्चा करून ते सोडविण्यासाठी उपस्थित संबंधित अधिकाऱ्यांना सूचना केल्या. आयता येथील गॅस सिलेंडरचा स्फोटाने मृत्यू पावलेल्या जयस्वाल कुटुंबाच्या घरी भेट दिली, त्यानंतर तेथील मंदिरा समोरील सभा मंडपात स्फोटाच्या वेळी आग विझविण्यासाठी ज्यांनी ज्यांनी प्रयत्न केले आणि जे जखमी झाले त्या सर्वांचा शाल व श्रीफळ देऊन किशोर भाऊ तिवारी यांनी सत्कार केला.
त्यानंतर गावकऱ्यांशी विविध समस्या , अडचणी यावर चर्चा केली, आयता वासियांनी विद्युत चा प्रश्न पोटतिडकीने किशोर भाऊ तिवारी यांच्या पुढे मांडला, काही युवकांनी तर आयता, कापेश्वर , खडका, चिमटा, कवठा, उमरी, झापरवाडी, वरुड, दातोडी ही गावे नक्षलग्रस्त व आदिवासी झोनमध्ये येत असल्यामुळे या गावासाठी विशेष बाब म्हणून ३३ के.व्ही.विदयुत चे नवीन उपकेंद्र मंजूर करावे अशी विनंती किशोर भाऊ तिवारी यांच्याकडे केली,
किशोर भाऊ तिवारी यांनीही आपण याबाबत वरिष्ठांशी बोलून या भागातील विद्युत चा प्रश्न सोडवण्यासाठी निश्चितपणे प्रयत्न करू असे उपस्थितांना आश्वासन दिले.
यावेळी राशन कार्ड नसलेल्यांना राशन कार्ड देण्यात यावे , राशन कार्ड असून धान्य मिळत नाही त्यांना धान्य देण्यात यावे अशा सूचनाही किशोरभाऊ तिवारी यांनी उपस्थित असलेल्या आरणीचे तहसीलदार श्री. परशराम भोसले यांना दिल्या.
विद्युतच्या प्रश्नावर गावकऱ्यांच्या तक्रारीवरून यावेळी उपस्थित असलेल्या शेख नावाच्या अभियंत्यांची किशोरभाउ तिवारी यांनी चांगलीच कान उघाडणी केली. त्यानंतर उमरी ( काप ) येथील विद्युत तारा अंगावर पडून एक हात गमावलेल्या व पूर्ण अंग भाजलेल्या प्रमोद नेवारे यांच्या घरी जाऊन किशोर भाऊ तिवारी यांनी त्यांची आस्थेने विचारपूस केली तसेच तहसीलदार व विद्युत मंडळाच्या अधिकाऱ्यांना या प्रकरणी प्रमोद नेवारे यांना शासकीय जी काही मदत व सहकार्य करता येईल ते करण्याच्या सूचना केल्या.
उमरी ( काप ) येथील वार्ड नंबर २ मधील पिण्याच्या पाण्याची समस्या सोडविण्याविच्या संदर्भात तेथील महिला पुरुषांनी किशोरभाऊ तिवारी यांच्याकडे मागणी केली त्यावेळी किशोर भाऊ तिवारी यांनी उपस्थित असलेल्या सहाय्यक गटविकास अधिकारी मनवर व विस्तार अधिकारी चोपडे यांना पिण्याच्या पाण्याच्या संदर्भात काय काय उपाययोजना करता येत असतील त्या तातडीने करण्याच्या सूचना केल्या. यावेळी किशोर भाऊ तिवारी यांच्यासोबत यवतमाळ जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष श्री. मुबारक तंवर व युवा कार्यकर्ते उमाकांत आडे हे प्रामुख्याने उपस्थित होते. किशोर भाऊ तिवारी यांच्या दोन्ही गावच्या दौऱ्यात पोलीस बंदोबस्ताची जबाबदारी पारवा पोलीस स्टेशनचे ठाणेदार विनोद चव्हाण पार पाडली.