
दैनिक चालु वार्ता, वृत्तसेवा
मुंबई :- केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी आपल्या जुहू तारा रोड येथील अधिश बंगल्यातील बेकायदेशीर बांधकाम नियमित करण्यासाठी केलेला अर्ज मुंबई महापालिकेने फेटाळला आहे. अर्ज फेटाळताना पालिकेने तब्बल १५ मुद्दे दिले असून त्यानुसार बांधकाम नियमित करणे शक्य नसल्याचे म्हटले आहे. मुंबई महापालिकने नारायण राणे यांच्या जुहू तारा रोड येथील अधीश बंगल्यातील बेकायदेशीर बांधकाम प्रकरणी नोटिस बजावली होती. फेब्रुवारी महिन्यात मुंबई महापालिकेच्या के-पश्चिम वॉर्ड कार्यालयाच्या अधिका-याने अधीश बंगल्यात जाऊन मोजमाप केले होते.
त्यात राणे यांनी बंगल्यात बेकायदेशीर बदल केल्याचे समोर आले. त्यानुसार पालिकेने राणे यांना नुकतीच ३५१ कलमानुसार नोटीस दिली होती. या नोटीसमध्ये बांधकाम करताना दिलेल्या प्लानमध्ये बदल करण्यात आले आहेत. पार्किंग, बेसमेंट आणि स्टोर रूमच्या जागेत रहिवाशी बांधकाम करण्यात आले आहे. पहिला, दुसरा, तिसऱ्या, पाचव्या माळ्यावरील टेरेसचा जागी रहिवाशी बांधकाम करण्यात आले आहे. चौथ्या, सहाव्या आठव्या माळ्यावरील पॉकेट टेरेसचा जागी तसेच आठव्या माळ्यावर टेरेस माळ्यावर रहिवाशी बांधकाम करण्यात आले असल्याचे पालिकेने नोटिसमध्ये नमूद केले होते.
हे बांधकाम पालिकेच्या परवानगीशिवाय केले असल्याने ते बेकायदेशीर आहे. यामुळे बेकायदेशीर करण्यात आलेले बांधकाम स्वतःहून काढावे असे नोटिसव्दारे कळवण्यात आले होते. याविरोधात नारायण राणे यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली. उच्च न्यायालयाने याचिका निकाली काढताना नोटिशीवर तूर्तास कुठलीही कारवाई नको, असे न्यायालयाने म्हटले आहे.