
दैनिक चालु वार्ता
अमरावती प्रतिनिधी
श्रीकांत नाथे
अमरावती :- अचलपूर शहरात पोलीस यंत्रणा सुसज्ज ठेवण्यात आली आहे.नागरिकांनीही संयम ठेवून एकजुटीचे दर्शन घडवले आहे.पुन्हा अनुचित घटना घडू नये.त्यामुळे अफवांवर विश्वास ठेवू नये व शांतता राखावी,असे आवाहन जिल्हाधिकारी पवनीत कौर यांनी आज अचलपूर येथे केले. अचलपूर येथे काल रात्री दोन गटांत वाद निर्माण होऊन दगडफेकीची घटना घडली.याप्रकरणी पोलीसांनी तत्काळ कारवाई करत काहीजणांना ताब्यात घेतले व शहरात संचारबंदी लावण्यात आली.या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांनी अचलपूर येथे जाऊन घटनास्थळाची पाहणी केली व नागरिकांना शांततेचे आवाहन केले.
जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी पोलीस व तालुका प्रशासनासमवेत बैठक घेऊन परिस्थितीचा आढावा घेतला.विशेष पोलीस महानिरीक्षक चंद्रकिशोर मीना,प्र.पोलीस अधिक्षक शशिकांत सातव,उपविभागीय अधिकारी संदीपकुमार अपार,तहसीलदार मदन जाधव आदी यावेळी उपस्थित होते. शहरात सध्या शांतता आहे.पोलीस व इतर यंत्रणा सुसज्ज आहेत.नागरिकांनी यापुढेही शांतता कायम राखावी,असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले.
समाजात विद्वेष पसरविण्याचा प्रकार कुठे घडत असेल तर तत्काळ यंत्रणेला निदर्शनास आणून द्यावे.समाजकंटकांवर कठोर कारवाई करण्यात येईल.शहरातील सार्वजनिक ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरा यंत्रणा बसविणे आवश्यक आहे.त्याचप्रमाणे,पुरातत्व विभागाने प्राचीन ठेव्याच्या संरक्षणासाठी उपाययोजना करण्याचे निर्देशही त्यांनी दिले. शहरात शांतता प्रस्थापित झाली आहे,तथापि,आज रात्रीची संचारबंदी कायम ठेवून त्यानंतर पुढील निर्णय घेतला जाणार आहे.