
दैनिक चालु वार्ता
औरंगाबाद प्रतिनिधी
मोहन आखाडे
• वार्ड व गाव निहाय लसीकरण प्रमाण वाढविण्यावर भर
औरंगाबाद :- कोविडच्या संभाव्य लाटेपासून संरक्षणासाठी कोविड प्रतिबंधक लसीकरण हाच प्रभावी उपाय आहे, शहरात वार्ड निहाय व ग्रामीण भागात गावानिहाय लसीकरणाचे प्रमाण वाढविण्यासाठी नगरसेवक व संरपच यांच्या सहकार्यांनी लसीकरणाचे उदिष्ट पूर्ण करणार असल्याचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष सुनील चव्हाण यांनी सांगितले. जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण समितीची बैठक पार पडली, यावेळी ते बोलत होते.
या बैठकीत आमदार अंबादास दानवे, पोलिस आयुक्त निखील गुप्ता, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी निलेश गटणे, अपर जिल्हाधिकारी अनंत गव्हाणे, महानगरपालिकेचे सहायक आयुक्त बी.बी. नेमाणे, निवासी उपजिल्हाधिकारी मंदार वैद्य, उपजिल्हाधिकारी संगिता सानप , संगिता चव्हाण, कन्नडचे उपविभागीय अधिकारी जनार्धन विधाते, पैठण – फुलंब्रीचे उपविभागीय अधिकारी स्वप्नील मोरे, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. पारस मंडलेचा, घाटी रुग्णालायाच्या डॉ. वर्षा रोटे, जिल्हा आरोग्य अधिकारी सुधाकर शेळके आदी अधिकारी उपस्थित होते.
शहरी भागातील ज्या वार्डात आणि ग्रामीण भागातील आरोग्य केंद्राच्या हद्दीतील गावात लसीकरण कमी झालेले आहे अशा ठिकाणी जिल्हा प्रशासन व आरोग्य यंत्राणाने लोकप्रतिनिधींना सोबत घेऊन लसीकरणाचे उदिष्ट पुर्ण करण्याची सूचना आमदार अंबादास दानवे यांनी केली. या बैठकीमध्ये खालील निर्णय घेण्यात आले .
• महिना अखेर पूर्वी लसीकरण उदिष्ट पूर्ण करण्याचे संबधित यंत्रणेला निर्देश दिले.
• 12 ते 18 वयागटातील लसीकरणासाठी विशेष मोहिम.
• शाळा, गल्ली, गावनिहाय लसीकरणाचा ॲक्शन प्लॅन तयार करुन लसीकरण वाढवण्यावर भर.
• नागरिकांना लसीकरणाचे महत्व पटवून देण्यासाठी प्रचार व प्रसिद्धी करण्यावर भर