
दैनिक चालु वार्ता
औरंगाबाद प्रतिनिधी
रामेश्वर केरे
औरंगाबाद :- औरंगाबाद जिल्ह्यातील प्राचीन देवस्थान असलेल्या लासुरगांव (ता.वैजापूर) येथील दाक्षायणी देवीच्या यात्रा महोत्सवानिमित्त मंगळवारी(ता.19) मातेला वस्त्रालंकार परिधान करून ओटी भरण्यात येईल. गुरुवारी(ता.21) मातेच्या यात्रा महोत्सवास प्रारंभ होणार आहे. आगामी 3 मे पर्यंत चालणाऱ्या या महोत्सवादरम्यान विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. कोरोनानंतर पहिल्यांदाच निर्बंधमुक्त वातावरणात पारंपरिक पद्धतीने यात्रा भरणार असल्याने ग्रामीण भागात उत्साहाचे वातावरण आहे.
जिल्ह्यातील प्रसिध्द देवस्थान असलेल्या दाक्षायणी देवीच्या दर्शनाला भाविक मोठ्या संख्येने येत असतात.यंदाच्या यात्रा महोत्सवानिमित् कुलस्वामिनीस कांकण बांधण्यात आलेले आहे.गुरूवारी (ता.21) यात्रेला प्रारंभ होत असून शुक्रवारी (ता.22) मातेची पालखीसह गादी,पोथी,टोप मिरवणूक, शनिवारी (ता.23) मातेस महाभिषेक, मंगळवारी (ता.3मे) यात्रा महोत्सवाची सांगता होणार आहे. महोत्सवादरम्यान मातेची पूजा,आरती,चौघडा,नैवेद्य महाप्रसाद आदींसह विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
महोत्सवानिमित्त ज्वेलरी, खेळणी, कपडा, भांडी, शीतपेये, उपहारगृहे, पानफुल, नारळ, प्रसादांच्या दुकानांची रेलचेल असते.तसेच फिरती सिनेमागृहे, रहाटपाळणी आदी मनोरंजनाच्या साधनासह यात्रा गजबजलेली असते. देवीचे मंदिर शिवना नदीच्या काठी असून नदीपात्रात यात्रा भरते. मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात येत असून संस्थानच्या वतीने उन्हापासून बचाव करणारी यंत्रणा तसेच पिण्याच्या पाण्याची व्यवस्था आदी सुविधा देण्यासाठी पुढाकार घेतला जात आहे.
भाविकांनी यात्रामहोत्सवाचा लाभ घ्यावा असे आवाहन संस्थानचे अध्यक्ष कल्याणचंद मुनोत, उपाध्यक्ष शिवाजीराव भिसे, सचिव आसाराम शेजूळ, विश्वस्त सुभानराव देशमुख, राधेश्याम शर्मा, किशोर कुलकर्णी, जगन्नाथ हरिश्चंद्रे, , व्यवस्थापक विष्णू हरिश्चंद्रे, संतोष शेलार, पुजारी प्रकाश जोशी, कर्मचारी, ग्रामस्थांनी केले आहे.