
दैनिक चालु वार्ता
पुणे प्रतिनिधी
शाम पुणेकर
पुणे :- पुण्यात सध्या मारुती सुझुकीच्या इको गाडीचे सायलेन्सर चोरीच्या घटना प्रचंड वाढताना दिसत आहेत. विशेष म्हणजे पुणे पोलिसांनी इको गाडीच्या सायलेन्सर चोरी प्रकरणी दोन चोरट्यांना बेड्या ठोकल्या आहेत. हे चोर अवघ्या विशीत आहेत. पण त्यांचे उपद्व्याप शरमेने मान खाली घालवणारेच आहेत. या चोरट्यांनी आतापर्यंत सहा इको गाड्यांचे सायलेन्सर चोरी केल्याचं कबूल केलं आहे. विशेष म्हणजे पोलिसांनी या चोरट्यांना तत्परतेने रंगेहाथ पकडले असून या कारवाईचं खरंच कौतुक करायला हवं.
विशेष म्हणजे हे चोरटे चक्क लाखो वारकऱ्यांचं श्रद्धास्थान असलेल्या आळंदीचे आहेत. पुण्याच्या लोणी काळभोर पोलीस ठाणे हद्दीत 2021 ते 2022 या दरम्यान इको कारचे सायलेन्सर चोरीला गेल्याच्या सहा तक्रारी आल्या होत्या. पोलिसांनी देखील या प्रकरणाकडे गांभीर्याने लक्ष केंद्रीत केलं होतं. पोलिसांचा या प्रकरणात तपास सुरु होता. यासाठी पोलिसांनी काही सूत्रांना, खबऱ्यांनाही कामाला लावलं होतं.
चोर बाजारात सायलेन्सरमध्ये असलेली प्लॅटेनियम धातूची पट्टी कोणी विकतंय ता याकडे करडी नजर ठेवण्याचं काम पोलिसांकडून सुरु होतं. या दरम्यान 16 एप्रिलला संशयित आरोपी हे उरुळी देवाची परिसरात येणार असल्याची माहिती खबऱ्यांकडून पोलिसांना मिळाली. पोलिसांनी उरुळी देवाची परिसरात सापळा रचला. त्यानंतर संशयित आरोपी उरुळी देवाची परिसरात आल्यानंतर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं. या आरोपींकडे सायलेन्सरमधील प्लॅटिनियमची प्लेट सापडली.
पोलिसांनी त्या सगळ्या प्लेट जप्त केल्या. चोरट्यांनी अशाप्रकारे डझनभर गाड्यांचे सायलेन्सर चोरी केल्याचं नंतर तपासातून समोर आलं. संशयित आरोपी हेच खरे चोर असल्याची शहानिशा झाल्यानंतर पोलिसांनी दोघांना अटक केली. शिवप्रसाद रोकडे (वय 21) आणि राम ढोले (वय 20) अशी आरोपींची नावे आहेत. दोघे आरोपी हे आळंदीचे रहिवासी आहेत. पोलिसांनी आरोपींची कारही जप्त केली आहे.