
दैनिक चालु वार्ता, वृत्तसेवा
कोलकाता :- पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी बुधवारी राज्यपाल जगदीप धनखर यांच्या मार्फत केंद्र सरकारला उद्योगपतींना केंद्रीय यंत्रणांमार्फत त्रास होणार नाही याची काळजी घेण्याचे आवाहन केले.कोलकात्यात आयोजित करण्यात आलेल्या ग्लोबल बिझनेस परिषदेच्या समारोप प्रसंगी त्या बोलत होत्या.
यावेळी राज्यपाल धनकर हेही उपस्थित होते. राज्यपालांना उद्देशून त्या म्हणाल्या की केंद्र सरकारच्या कारवाईच्या विरोधात उद्योगपती बोलू शकत नाहीत. त्यांच्यावतीने मी तुम्हाला आवाहन करते की केंद्राला सांगा की उद्योगपतींना नाहक त्रास देऊ नका.
पश्चिम बंगालच्या औद्योगिकीकरणात हे उद्योगपती हातभार लावत आहेत. त्यांना त्यांचे काम करू द्या अशी सुचना तुम्ही आमच्यावतीने केंद्राकडे करा असे जाहीर आवाहन ममतांनी करताच तेथे उपस्थित असलेल्या सर्व उद्योगपतींना टाळ्यावाजवून ममतांच्या सूचनेचे स्वागत केले. केंद्रीय यंत्रणांनी अलिकडेच पश्चिम बंगाल मधील अनेक औद्योगिक आस्थापनांवर कारवाई केली आहे. त्या पार्श्वभूमीवर ममतांनी ही सूचना केली. तत्पुर्वी याचा कार्यक्रमात राज्यपालांनीही ममतांच्या कार्याचे प्रथमच जाहीर कौतुक केले होते.