
दैनिक चालु वार्ता
नांदुरा प्रतिनिधी
किशोर वाकोडे
नांदुरा :- दि. २०. भारत सरकारच्या आयुष मंत्रालयाद्वारे गुजरात येथील गांधीनगर येथे आयोजित तीन दिवसीय आयुष परिषदेला बुलडाणा जिल्ह्यातुन दोन औषध उत्पादक शेतकरी सहभागी झाले आहेत. यामध्ये नांदुरा तालुक्यातील विष्णू एकनाथ बाठे व जळगांव जामोद तालुक्यातुन रामचंद्र अर्जुन वाघ यांचा समावेश आहे .दि.२० एप्रिलपासून सुरू झालेल्या आयुष शिखर परिषदेच्या उद्घाटन प्रसंगी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, माॅरीषसचे प्रधानमंत्री रविंद्र जगन्नाथ, केंद्रीय आयुष मंत्री सर्वानंद सोनवाल, जागतीक आरोग्य संघटनेचे महासंचालक यांनी संबोधीत केले.
औषध उत्पादक शेतकरी, खरेदीदार, व औषध निर्माण करणाऱ्या कंपनीचे प्रतिनिधी करीता दि.२० एप्रिल ते २३एप्रिल असे तीन दिवस ह्या आयुष परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे.यामध्ये ४०० शेतकरी, व्यापारी, व औषध कंपन्याचे प्रतिनिधी व ५०० विद्यार्थी असे एकूण ९०० प्रतिनिधी सहभागी झाले आहेत. ह्यावेळी विविध सत्रात कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहे. तीन दिवस विविध प्रकारच्या प्रदर्शनीचे आयोजन सुद्धा करण्यात आले असल्याची माहिती नांदुरा तालुक्यातुन सहभागी औषध उत्पादक शेतकरी विष्णू बाठे यांनी भ्रमणध्वनी द्वारे दिली. ह्या परीषदेमुळे औषध उत्पादक शेतकऱ्यांना चांगली प्रेरणा मिळेल असेही ते पुढे म्हणाले.