
दैनिक चालु वार्ता
पुणे प्रतिनिधी
शाम पुणेकर
बारामती/पुणे :- ज्यांनी ८०० शेतकऱ्यांचा बळी घेऊन कृषी कायदे मागे घेतले. ज्यांच्यामुळे रासायनिक खतांच्या किमती वाढल्या. त्यांच्यासोबत कसं जाणार? असा सवाल करत आगामी काळात भाजपसोबत जाण्याच्या प्रश्नावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष व माजी खासदार राजू शेट्टी यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. बारामतीत पत्रकारांशी संवाद साधताना शेट्टी म्हणाले, शेतकऱ्यांचे प्रश्न गंभीर बनले आहेत. एप्रिल अखेर आला तरी अजूनही मोठ्या प्रमाणात ऊस गाळपाविना शेतात शिल्लक आहे.
एफआरपीचे तुकडे करून शासनाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान केले आहे. वीजेचा लपंडाव सुरु आहे. त्यात अनेक शेतकऱ्यांचा बळी जातो आहे. शिरोळसह अन्य ठिकाणी त्यातून दुर्घटना घडल्या आहेत. इंधन दर वाढीमुळे मागताना खर्च टनामागे २१४ रुपयांची वाढला आहे. त्यामुळे सध्या मिळणारा ऊस दर परवडत नाही. भरमसाठ आश्वासनांची खैरात करणाऱ्या सरकारने शेतकऱ्यांचे एकही आश्वासन पूर्ण केले नाही. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे जीणे हैराण झाले आहे; शेतकरी रस्त्यावर आला आहे, असे ते म्हणाले.