
दैनिक चालु वार्ता
प्रतिनिधी देगलूर
संतोष मंनधरणे
देगलूर :- वचनस्तंभ चॅरिटेबल ट्रस्ट संचलित राष्ट्रसंत मिशनच्या वतीने केंद्रीय लोकसेवा आयोग व महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेची तयारी करणाऱ्या नांदेड व हिंगोली जिल्ह्यातील विद्यार्थ्यांसाठी रविवारी (दि. २४) सकाळी १० वाजता शहरातील स्टेडियम परिसरात असणाऱ्या शंकरराव चव्हाण प्रेक्षागृहात मोफत मार्गदर्शनपर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी पुणे येथील भगीरथ आयएएस अकॅडमीचे संचालक रंजन कोळंबे यांचे मार्गदर्शन लाभणार आहे. या कार्यक्रमाचे उद्घाटन भाजपचे प्रदेश संघटन सरचिटणीस तथा तर्पण फाउंडेशनचे कार्यकारी संचालक श्रीकांत भारतीय यांच्या हस्ते होणार आहे, अशी माहिती भाजपा दिव्यांग विकास आघाडीचे प्रदेश प्रभारी तथा राष्ट्रसंत मिशनचे संस्थापक रामदास पाटील सुमठाणकर यांनी दिली आहे.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खा. प्रताप पाटील चिखलीकर हे राहणार असून, प्रमुख अतिथी म्हणून हिंगोलीचे आमदार तानाजीराव मुटकुळे यांची उपस्थिती लाभणार आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांसाठी मार्गदर्शन व्हावे, यासाठी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. नांदेड व हिंगोली जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनी या व्याख्यानाचा लाभ घ्यावा, असे आवाहन रामदास पाटील सुमठाणकर यांनी केले आहे.