
दैनिक चालु वार्ता
औरंगाबाद प्रतिनिधी
मोहन आखाडे
औरंगाबाद :- औरंगाबाद येथील शासकीय कला महाविद्यालयाच्या सुवर्ण महोत्सवी वर्षाच्या निमि1त्ताने औरंगाबाद च्या माजी कलावंत विद्यार्थ्यांनी दिनांक १५ एप्रिल रोजी भव्य स्नेह सम्मेलन कार्यक्रम सोहळा आयोजित केला होता..या सोहळ्यात देश विदेशातुन अनेक मागील पाच दशकातील अनेक विद्यार्थ्यांनी तसेच प्राध्यापक मंडळींनी सहभाग घेतला होता.. हा सोहळा शासकीय कला महाविद्यालय झनाना महल जुनी इमारत (जनाना महल ) व त्या शेजारीच बांधलेली महाविद्यालयाची नुतन वास्तु येथे भेट देउन पल्लवांकुर नर्सरी येथील बागेतील रम्य वातावरणात पार पडला.
या सोहळ्यात सुमारे चाळीस वर्षापुर्वीपासुन आजपर्यंतचे अनेक विद्यार्थी एकत्र आले होते तर अनेक विद्यार्थी हे जवळपास पंचवीस ते चाळीस वर्षानंतर आपल्या जुन्या मित्रांना प्रथमच भेटत होते. हा सोहळा सकाळी दहा वाजेपासुन ते रात्री दहा पर्यंत मौजमस्तीत पार पडला माजी विद्यार्थ्यांच्या भेटी गुरुजनांचे सत्कार कलावंत विद्यार्थ्यांनीच सादर केलेला संगीत रजनीचा कार्यक्रम तसेच सहभोजन, चित्रप्रदर्शन तथा प्रात्यशिकासह अत्यंत जल्लोषात पार पडला. या महाविद्यालयातील जी डी आर्ट उपयोजित कला १९८३ चे माजी विद्यार्थी श्री राजेंद्र करपे रा.औरंगाबाद यांनी संपुर्ण दिवसभरातील आयोजित कार्यक्रमावरील लिहलेला विस्तृत लेख.
शाकम स्नेहसम्मेलन माझ्या चष्म्यातून
स्मृती म्हणजे काय ? आठवणींचा हिंदोळा.. आपण व्यतीत केलेला सुखद क्षणांचा आभास.. डोळे मिटावे अन त्या मंतरलेल्या अनुभवलेल्या क्षणांचे अंतर्मनाच्या दृष्यपटलांवर चलचित्र सुरु व्हावे त्या आनंदोत्सवातील निनादणारे ध्वनी पुनः पुनः कानात गुंजन करु लागणे याच सर्व स्मृती तरंगात आपले देहभान विसरुन जावे. अशाच असतात अविस्मरणीय अनंत अविरत तरोताज्या अन टवटवीत राहणाऱ्या सुखद स्मृती… सदैव या स्मृतींचा सुगंध अवती भवती दरवळून आपल्या जिवणातील नित्याच्या कटकटींवर आल्हाद मोरपंखाच्या हळुवार स्पर्षासम सर्वांगावर सुखद शहारे रोमांचासह अदभुत आनंदाची अनुभुती देणाऱ्या असतात अशा आनंददायी स्मृती.. या स्मृती तरंगाच्या लहरी मस्तिष्काच्या आसमंतात घुमू लागतात अन नकळत त्याची परिणिती हलक्याश्या हास्यरुपात चेहऱ्यावर खुलतात..
मी का हसलो , का आनंदलो याचा उलगडा माझ्या सोबतच्याला नसतो. नसेनाका मी मात्र अशा सुखद स्मृतींच्या आघाताने ठार स्मृतीवेडा झालेला असतो. अशीच काही अवस्था माझी झालेली होती. सम्मेलन संपलं सर्वांचा निरोप घेउन घराकडे निघालो माझ्या निवासस्थानाच्या परिसरात असणाऱ्या गुरुजनांना सोबत घेउन येण्याची व परत घरी पोहचविण्याची जवाबदारी स्विकारली होती तसे गुरुजणांना सोबत घेउन दिवसभरातील गप्पा मारत दोन्ही सरांना घरी सोडले. एव्हाना रात्रीचे बारा वाजले. घरात प्रवेश करताच सर्वात आधी बायकोला जवळचा सर्व कार्यक्रमाचा निचोड असलेला आपला गृप फोटो दाखवला.
तिनेही मोठ्या उत्सुकतेने व कौतुकतेने हा गृप फोटो पाहुन तीचा यात प्रत्यक्ष संबंध नसतानाही तिने उत्सुकता दर्शविली. मी बोटाने फोटोतील एकेकाचा तीला परिचय करुन दिला. मलाही आॕलिंपिक पदक जिंकून आणल्याचा आनंद झालेला पाहुन तीने अखेर जांभळी दिली. बाकी सविस्तर वृत्तांत सकाळी सांगतो असे म्हणुन मी ही कलंडलो. दिवसभरचा थकव्यामुळे अन दुपारच्या वर्षातुषार जलधारेच्या कृत्रीम पावसात आताच्या अवजड देहाच्या व्यंगात्मक केलेल्या हालचाली ज्याला आपण रेनडाँस म्हणू या. त्यामुळे पायांना गोळे येणे नैसर्गिकच असल्यामुळे पाय गोळा करुन डोळे मिटुन निद्रेच्या पाशात जाण्याचा प्रयत्न केला.
अन अचानक त्या रेनडाँन्स चे दृष्य हुबेहुब बंद डोळ्या समोर तरळु लागले. सायंकाळच्या कराओकेच्या संगीत महफिलीतील कलावंत मित्रांच्या गायनाचे सुर हेमंत कुमार,पंकज उधास ,किशोर कुमार महम्मद रफी यांचे यांची गाणी व संगीत जस्सेच्या तसे ऐकु यायला लागले आणि दिसुही लागले. तो सेक्सोफोनचा जादुई निनाद व माउथ आॕर्गनवरील विशिष्ट गीत संपुर्ण संगीत मैफीलीचा थाट कर्णमधुर स्वरांनी ताल लय व विवीध अभिनयाने रंगलेल्या कलाविष्काराचे हुबेहुब चित्र आणि याशिवाय आज मिलन झालेल्या एक एक मित्राचे चेहरे डोळ्या समोर येत होते.
आपल्या मित्रांनी आपल्याला मारलेल्या मिठ्या आलिंगणे आरोळ्या ओढाओढी काहींशी जुनी ओळख पटवण्यासाठीचा केलेला संवाद या भेटीतील सर्व मित्रांचे गुरुजनांचे ‘तब और अब ‘ चा दिसलेला बदल त्यावर होणाऱ्या हसुन खिदळून केलेल्या गप्पा, अनेक वर्षानंतर म्हणजे ” कबके बिछडे हुए हम आज यहाँ आके मिले ” असे अनेक प्रसंग एकच गर्दी करु लागले मौज मजा आनंदासह त्या झनाना महल वास्तू माउलीचं रुदन काळजाला छिद्रे पाडत आमच्या विव्हळणार्या मनाची समजूत घालत होतं. असे किती तरी प्रसंग होते जे चार दशकांतील सर्व घडामोडी सर्व घटना सर्व आठवणीसह एकच कल्लोळ माजवत होते.
लाख प्रयत्न केले तरी झोप काही येईना. असेच येतील त्या दृष्याला सामोरे जात कधी हसु कधी आँसुच्या स्मृती उजाळत सुमारे रात्रीच्या अडीचला कसा डोळा लागला ते कळलेच नाही. दुसऱ्या दिवसाची पहाट उजाडली ती पहाटस्वप्नांतील याच सोहळ्यातील एकेका प्रसंगाच्या दृष्य आठवणीने. प्रातःइशस्मरणाकडे सहजतेने घेउन मोठ्या अधिरतेने पहिले मी माझा मोबाईल आॕन केला व शाकमच्या सर्व गृप्सवरील काल संप्पन्न झालेल्या स्नेह सम्मेलनाच्या चित्र व संदेशांचा होणारा वर्षाव अतुर अधीरतेने पहातच राहीलो. पुनः एकदा काल घडलेले एकेक प्रसंग पाहुन स्मृती सागरात पार डुंबून गेलो.
पुनश्च एक एक मधुर प्रसंग क्रमाक्रमाने डोळ्यासमोर तरळु लागले. आज आपले शाकम स्नेह सम्मेलन संपुन चार दिवस झाली देशविदेशांतुन आलेली सर्व मित्रमंडळी आपआपल्या घरी पोहचले देखील असेल. झालेल्या कार्यक्रमाच्या धुंदीची नशा काही केल्या उतरेना. या कलावंताच्या महासम्मेलनाचा मी एक सहभागी घटक बनू शकलो याचा अभिमान मला आयुष्यभर राहणार. काही मित्र येण्यासाठी उत्कट इच्छा बाळगून होते मात्र काही अपरिहार्य अडचणी उदभवल्यामुळे या कार्यक्रमास मुकले. तर काही निराशावादी सुस्त मित्रांनी मुद्दामून या सम्मेलनाकडे पाठ फिरवली. काहींची मजबुरी तर काहींचे काही बहाणे होते.
काहींची आर्थिक कंजुषी तर काहींचा नाहक विरोध परंतु भाग्यवान ठरलो आम्ही ज्यांनी यात सहभाग नोंदवला. सोहळे अनेक होतात अनेक होतीलही पण एक अपुर्व अदभुत सोहळा याची देही याची डोळा या सम हाच असा सोहळा पुनः होणे नाही. लाख संप्पती कमविता व लुटता येईल जमा करता येईल पण असा आनंद खरेदी करता येणार नाही. आयुष्यातील अनमोल अशा आनंद क्षणाचे देहभान विसरणारे वातावरण जे जगले ते धन्य झाले व ज्यांनी मुद्दामुन जाणिवपुर्वक येण्याचे टाळले त्यांचेबद्दल न बोललेलेच बरे . ठरल्याप्रमाणे दिनांक १५ एप्रिल चा शाकम सुवर्ण महोत्सवी सोहळ्याचा दिवस उजाडला सर्व नियोजित रुपरेषेनुसार ठरल्याप्रमाणे सकाळी नउ वाजता श्री परमार सरांना घेउन मी शाकमच्या नुतन वास्तुकडे गाडी वळवली.
झनाना महलला जाणारा सरळधोपट रस्ता नव नव्या शासकीय वास्तुच्या अवतरण्याने नवीन शाकमला ही प्रांगण उरलेले नव्हते अडचणीतुन वाट काढुन शाकमच्या कम्पाउंडजवळ गाडी पार्क करुन शाकमच्या नववास्तुत प्रवेश केला. प्रवेश द्वाराजवळ सर्व जमलेला सर्व गुरुजनांसह देशविदेश दुरदूरुन आलेल्या शाकमच्या माजी विद्यार्थ्यांचा जत्था येणाऱ्या प्रत्येक मित्राचे आनंद उत्साहाने स्वागत गळाभेट हस्तांदोलने करत तसेच उपस्थित गुरुजणांचे चरणस्पर्श करत आपुलकीने एकमेकाची विचारपुस करतानाचे दृष्य अतिषय भावूक झालेले होते. कुणाला काय करावे कसे वागावे कुणाकुणाला ओळखावे काय विचारावे कुणालाही काही सुचेना. क्षणभर मलाही असे वाटले की आजच कॉलेज सुरु झालेय व आजच कॉलेजचा पहिलाच दिवस आहे.
आदरणीय श्री पेंडसे सर,श्री परमार सर ,श्री चौधरी सर, आदरणिय श्री काटे सर,श्री कुरेकर सर ,सौ.कुरेकर मॕडम ,चरपे सर,श्री मोरे सर,श्री देशमुखसर , श्री गोपी वाघमारे सर , श्री दहिवाळ सर,आणि इतरही शिक्षक वृंद व शिष्यसमुहांचे भेटीचे प्रसंग अतिशय विलोभनीय होते. या शाकमच्या द्वारभेटी समयी जमलेल्या सर्व गुरु शिष्य तथा इतर सर्व उपस्थितांसह आजचा दिवसभराचा कार्यक्रम वेळापत्रकाप्रमाणे संप्पन्न व्हावा जराही वेळेचा अपव्यय होउ नये या साठी आयोजका पैकी श्री बाळु देशपांडे व गोविंद गोंडे ने मुव्हेबल साउंडमाईक चा ताबा घेउन सर्वांना योग्य तसे सुचनांकीत केले. सुचनेप्रमाणे सर्वांनी शाकमच्या झनाना महलच्या दर्शनासाठी त्या दिशेने कुच केले.
श्री सचिन गोडसे (Charli) श्री संजय चुबे श्री राजेश शर्मा या तीन छायाचित्रकाराचे कॕमेरे येथील सर्व भावूक क्षण टिपण्या सज्ज झालेले होते तसेच झनाना महलाची अवस्था पाहुन ते क्षण आपल्या मोबाईल मध्ये जतन होण्या साठी सर्वांचे मोबाईलचे कॕमेरे आॕन मोड वर आले. झनाना महलाच्या प्रांगणात आम्ही सर्वजन जमा झालो… अंतीम समयाच्या घटकेचा श्वास घेत असलेल्या असहाय्य वास्तुचा मुक आक्रोश आमच्या कानावर आदळू लागला. या वास्तुच्या एकेका अवयवाला स्पर्ष करुन कशी आहेस? हे विचारण्याचेही धारिष्ठ्य कुणाला होईना. या वास्तुच्या आसपास परिसरात आम्ही पुर्वी घालवलेले ते दिवस आठवले. जो तो तेथील एक एका ठिकाणाचे पुर्वी कसे अन आता काय हाल झाले याचीच तुलना करत होते.
आम्ही त्या झनाना महालात फिरत होतो एक एक वर्ग,कार्यालय, आमच्या डार्करुम,लायब्ररी ,प्रिंटींग विभाग,आमच्या बसण्याच्या जागा ते जिने,पॕसेज मोठे दरवाजे मोठाले गवाक्ष झरोके कमाणी ,छते , पायऱ्या , राजाभाउची कँटीन अशा अनेक या महालाचे अविभाज्य भाग आता साथ सोडतांना आक्रंदुन किंचाळुन आम्हाला काय वेदना होताहेत सांगत सुटले. हतबल हताश आम्ही काही करु शकत नव्हतो फक्त त्या महलाच्या सद्यस्थितीतील भयानक रुपात भेट दिल्याचे साक्षीदार म्हणुन या झनाना महालाच्या साथ सोडणार्या त्या अवयव भग्न अवशेषासह मोबाईलवरी छायाचित्रे घेत सुटलो कारण याच आठवणी कदाचित शेवटच्या असणार आणि ज्या मित्रांना कदाचित या दुरावस्थेची कल्पना नसेल त्यांना हि अवस्था दाखविण्यास हेच माझे फोटो कामी येतील.
अत्यंत जड अंतःकरणाने आम्ही या झनाना महलाचे अंतिम दर्शन घेउन नुतन वास्तुकडे वळालो..तेथील अधिष्ठाता व कर्मचारी यांनी आम्ही सर्वांची चहापानाची सोय केली या नववास्तुतील नव कलावंत विद्यार्थ्यांनी वरच्या मजल्यावर कलादालनातील भरवलेले प्रदर्शन आम्ही सर्वानी पाहीले. नव्या पिढीचे नव्या दमाच्या कलावंताचे प्रदर्शन पाहुन आम्हालाही झनाना महलातील कला दालनातील आमच्या काळातील प्रदर्शन आठवले. आता आयोजक श्री अनंत देशपांडे व फोटोग्राफर यांनी या सम्मेलनासाठी उपस्थित असलेल्या सर्व सहभागी मित्राचा प्राध्यापक मंडळीचा शाकमच्या प्रवेशद्वारावरील पायऱ्यावर एक गृपफोटो घेण्याचे आवाहन केले व हाच गृपफोटो सर्व सभासदांना स्मृतीचिन्ह म्हणुन भेट देणार हे ही कळविले.
गृपफोटो सेशन नंतर श्री गोविंद गोंडे यांनी व्यवस्था केल्या प्रमाणे दोन बस पल्लवांकुर नर्सरी कडे पुढील कार्यक्रमासाठी सर्वाना घेउन जाण्यासाठी सज्ज होत्या तसेच अनेकांच्या खाजगी वाहनाने सर्वांनी शासकीय कला महाविद्यालयाला निरोप दिला. दुपारच्या १ वाजेची वेळ प्रखर उन्हाळ्याच्या तप्त सुर्यकिरणांच्या उष्ण झळयाने सर्वांगाची लाही लाही होत होती एक एक करत सर्व वाहने पल्लवांकुर नर्सरीत पार्क झाली. येथील चिकुच्या बागेत दाट गर्द सावलीत नैसर्गिक एअरकंडीशनमध्ये गोलाकार खुर्च्या मांडलेल्या होत्या तसेच कुठेतरी भारतीय बैठकीचीही सोय केलेली. शीतल जलासह येथे आल्या आल्या स्वागत पेय जलजीरा देउन सर्वांचे स्वागत झाले.
याच चिकुच्या बागेत आज दुपारचे सहभोजन होणार कारण भोजन व्यवस्थेची लगबग सुरु होती व भोजन पदार्थांचा दरवळ या गर्द सावलीत पसरला होता. येथे आम्ही बिनधास्त विसावयाला लागलो तर मुकीम तांबोळीने हातात माईक घेउन गझल शेरशायरी व गीत गायनाने एक आगळा समाँ बांधला. विद्यासागर बडेचे माउथआॕर्गन वादनाने काॕलेजच्या गॕदरिंगची आठवण झाली. परंतु गीत संगीत परफाॕरमन्स ठरल्याप्रमाणे सायंकाळी आहे हे बाळु ने सांगीतले अन गुरुजनांचा सत्कार हा कार्यक्रम आरंभीला. आम्हा सर्व आयोजक मंडळींना एक एक गुरुजनाचा सत्कार हे गुरुपोर्णिमेच्या सोहळ्या समानच असावे गुरुजनांच्या आशिर्वादांची थाप पडल्याने आम्ही धन्य झालो.
मुकीम तांबोळीने काही जनांचे कॕरीकेचर्स रेखाटले तर सुमित मॕडम यांनी गुरुजनांना त्यांच्या रेखाटलेल्या सुंदर व्यक्ती चित्राच्या सुबक फ्रेम सह भेट दिल्या. या सर्व घडामोडीचे सरकत्या कार्यक्रमाचे समालोचन बाळु देशपांडे,गोविंद गोंडे गिरिश कुलकर्णी हे माईकद्वारे लिलया करत असल्यामुळे अतिशय शिस्तीने कार्यक्रम चालु होता. आलेल्या सर्व उपस्थितांचा परिचय व संपादित यशाची माहिती देण्यात एक तास गेला. गुरुजनांचे शिष्यवर्गाची मनोगते झाली एकेकाचा परिचय होत असता बाळु व गोविंद हे सर्वांना कॉलेज काळातील वातावरण निर्माण करुन देत आताच्या कार्यक्रमात एक विशिष्ट मज्जा निर्माण करत होते. हे सर्व चालु असताना काही जन भोजनाकडे कधी वळले हे कळलेच नाही.
या चिकुच्या बागेत दाट छायेत आम्ररसा सह भजी पोळीभाजी मसाला भात सॕलर्ड वगैरे रुचीर भोजनावर आम्ही सर्वच जण ताव मारु लागलो. या रुचकर पक्वान्नावर ताव मारताना आमरसाच्या वाट्याही गटागटा संपु लागल्या. दुबईहुन आलेले या कार्यक्रमात सहभागी झालेले जेष्ठ विद्यार्थी श्री विठ्ठल देशमुख याचा वाढदिवसही आज असल्यामुळे येथे केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला. या चिकुच्या बागेतील मौजमस्ती व सत्कार , परिचय असे कार्यक्रम पार पडले आता हौशी मंडळी आताच्या या वयातही हुडदंग करण्यासाठी आपल्या वयाचे भान विसरुन जलतुषार कृत्रीम पावसाची व्यवस्था केलेल्या हॉलमध्ये रेनडाँन्स करण्यासाठी सुमारे साठ वर्षांची हि सर्व युवा मंडळी बेभान होउन नाचत राहीली.
एकच कल्लोळ,हशा, धांगडधिंगा,व भन्नाट डाँन्स आमचा तो ही या वयात याच्या व्हिडीओ क्लीप्स वारंवार आम्ही पाहत आहोत. या पल्लवांकुर नर्सरीतील दुपारच्या नियोजित कार्यक्रम जवळजवळ आटोपत आला. सुर्यही आता क्षितीजाकडे झुकत होता. आता सायंकाळच्या संगीत रजनी कार्यक्रमाची प्रतिक्षा होती तशी तेथील हिरवळीवर व्यवस्था चालुच होती. सुर्यास्त होण्याची वेळ आली वातावरण सोनेरी झाले हिरवळीवरीलच्या खुर्च्यांवर एकएक जन आसनस्त होत होते. एव्हाना अंधार वाढत जाउन विद्युत फोकस च्या लाईटांनी हिरवळीवर रंगत वाढवली आणि मंत्रमुग्ध वातावरणात बाळु देशपांडेच्या हातात माईक दिसला व मुखातुन स्व.श्री हेमंतकुमारची श्रवणीय गाणी एका मागुन एक सुरु झाली आणि मग काय एका बहारदार संगीत रजनी कार्यक्रमाला सुरवात झाली.
मुकीम तांबोळीची गझल ,शेर शायरी ,गोविंद,गिरिषचे सुत्रसंचलन, प्रशांत खरवडकर व अशोक चौडेकर संजय पांडे रामकस्तुरे यांचे अभिनय संजय घुगे , संजय महामुनी चे गाणी या सर्व समुहाचा रंगतदार आॕर्केस्ट्रा आम्हाला पहायला मिळाला. महेश औटे या एका मित्रानेही ऐनवेळी एन्ट्री करुन सेक्साफोन वरील विवीध गाणी वाजवून आम्हाला मंत्र मुग्धच केले. हा संगीत सादरीकरणाचा कार्यक्रम चालु असताना सांयंकाळच्या सुरुची भोजनास सुरवात झाली. सायंकाळच्या व दुपारच्या भरपेट भोजनाचा अंदाज पाहुन सांयंकाळच्या भोजनाचा मेनू अतिशय उत्कृष्ट होता. पराठे,कढी ,खिचडी ,दही, भुक नसतांनाही अनेकानी भोजन केले. आता कार्यक्रम अंतिम टप्यात आलेला होता काही मंडळीने आपआपल्या सोयीप्रमाणे कार्यक्रमाचा निरोपही घेतला होता.
सकाळी शाकममध्ये काढलेला गृप फोटो सुंदर लॕमेनेशन सह तयार होता. तो गृप फोटो सर्व सहभागी सदस्यांना वाटण्यात आला. एक प्रकारचा हा आठवणींचा पुरस्कारच होता हा गृपफोटो. हाच फोटो आपल्याला उर्वरीत आयुष्यात आजच्या शाकम स्नेह संम्मेलन सोहळ्याची तसेच आजच्या जागतिक कला दिनाच्या औचित्याची कायम स्वरुपात निरंतर आठवण देत राहील स्मृती देत राहील. हा सोहळा आयोजनासाठी अतोनात परिश्रम घेणारे व आपल्या कल्पक बुद्धीतुन या स्नेहसम्मेलनाचे सुत्रबद्ध पद्धतीने आयोजन करणे याचे विशेष श्रेय जाते ते श्री गोविंद गोंडे व बाळु देशपांडेला तसेच गिरीष कुलकर्णी .तसेच यशवंत कला महाविद्यालयाचे प्राध्यापक श्री रवी तोरवणे सर , ज्यांनी राहण्यासाठी उत्तम व्यवस्था केली.
आयोजनाच्या धावपळीत मन लाउन धावपळ करत काम करणारे श्री मिलींद भित्ते,श्री शशीकांत बक्षी ,देविदास शेटकार,प्रकाश कहाळेकर, प्रशांत खरवडकर,कापसीकर असे अनेक आयोजक मित्र कार्यक्रमाच्या सफलतेसाठी प्रयत्न करत होते. यात महत्विचे कार्य योगदान करणाऱ्या अनेक मित्रांचा अनावधानाने उल्लेख होउ शकलेला नाही त्यासाठी क्षमस्व. कार्यक्रम आयोजनाची मुळ कल्पना सुमित मॕडमची असावी कारण सुरवातीपासुन या कार्यक्रमावर त्यांचे लक्ष व डायरेक्शन दिसुन येत होते. सुमित मॕडम दिल्लीहुन,विठ्ठल देशमुख दुबईहुन व परमार सर हैद्राबादहुन आणि अनेक मित्र मंडळी मुंबई व पुण्याहुन नांदेड तथा इतर अनेक शहरातुन आलेली होती हे या कार्यक्रमाचे वैशिष्टये होय.
एक खंत कायमचीच वाटते कारण काय असेल मला माहित नाही मात्र हि खंत कायमच सलणार की या सम्मेलनात स्थानिक अनेक मंडळी हि जाणुन बुजून अनुपस्थित राहीलेली दिसली अन्यथा हे सम्मेलन महा – महाभव्य झाले असते. असो तरीही या अपुर्व सोहळ्याला खरोखरच तोड नाही. या कार्यक्रम यशस्वितेसाठी सर्वांनीच आॕनलाईन आपले योगदान पाठवले. अनेकांनी हिरारीने सहभाग घेतला, आयोजकानीही अतीशय सुंदर नियोजन केले तेंव्हाच तर असा सुंदर कार्यक्रम आयोजित झाला मी स्वतःला खरंच भाग्यवान समजतो कि मी या कार्यक्रमातील एक हिस्सा बनलो. मला आयोजक मंडळीत समाविष्ट करण्या आले त्यामुळे मलाही कार्यसफलतेसाठी सहकार्य करण्याची संधी मिळाली. दिवसभरातील संपुर्ण कार्यक्रमाच्या अखेरीला रात्री समारोप प्रसंगी कार्यक्रमाची सांगता करण्यासाठी आभार प्रदर्शन व्यक्त करण्याची मला संधी मिळाली हे माझे अहोभाग्यच.
सामुहिक पसायदानानंतर कार्यक्रमाची सांगता संप्पन्न झाली. तेथील सर्व सहभागी मित्रांनी मोठ्या जड अंतकरणाने एक एक मित्रांचा निरोप घेतला. दिवसभरातील असंख्य अगणित स्मृतींचे गाठोडे ह्रदयाशी कवटाळून दिनांक १५ एप्रिल २०२२ शाकम सुवर्ण महोत्सव वर्षाच्या निमित्तानं आयोजित एका अपुर्व स्नेह संम्मेलन सोहळ्याचे आयोजन सफळ संपुर्ण जाहले. एकच सांगावे वाटते की असा सोहळा पुनः होणे नाही. न भुतो न भविष्यती जय हो
( राजेंद्र करपे Applied Art – 1983 )