
दैनिक चालु वार्ता, वृत्तसेवा
पंढरपूर :- राष्ट्रवादी काॅंग्रेसचे आमदार अमोल मिटकरी हे सातत्याने वादग्रस्त वक्तव्य करुन समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहेत. पक्षाने त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी ब्राह्मण समाज बांधवांनी पंढरपुरात खासदार सुप्रिया सुळे यांना घेराव घालून केली. खासदार सुप्रिया सुळे या येथील श्री विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनास आल्या हाेत्या. दर्शनानंतर मंदिरातून बाहेर पडताच त्यांना ब्राह्मण समाज बांधवांनी घेराव घातला. यावेळी ब्राह्मण समाज बांधवांनी आमदार मिटकरी हे सातत्याने समाजात तेढ निर्माण हाेतील अशी वक्तव्य करीत आहेत.
सांगली येथील त्यांच्या वक्तव्याचा आम्ही निषेध करताे. आपणही त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी ब्राह्मण समाज बांधवांनी सुळे यांना केली. यावेळी ब्राह्मण समाज बांधवांनी मिटकरी यांच्या वादग्रस्त वक्तव्याचा निषेध म्हणून ट्विट करावे अशी देखील मागणी करण्यात आली. दरम्यान खासदार सुप्रिया सुळे यांनी मिटकरी काय म्हणाले ते मला माहिती नाही. त्यांच्या वक्तव्याने तुम्ही दुखावला असाल तर मी याची माहिती घेऊन जयंतरावांशी (जयंत पाटील) चर्चा करेन असे स्पष्ट केले.