
दैनिक चालु वार्ता
जव्हार प्रतिनिधी
दिपक काकरा
– ग्रामीण आदिवासी भागात मोठ्या प्रमाणात मोह फुलांची उपलब्धता
जव्हार :- काजूबोंडे आणि मोह फुलापासून बनवलेल्या दारूला आता देशी ऐवजी विदेशी मद्य म्हणून मान्यता देण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बुधवारी झालेल्या बैठकीत घेण्यात आला. काजूबोंडे व मोह फुलांच्या मद्यार्कपासून तयार होणाऱ्या मद्याला २००५ पासून देशी मद्य समजले जात होते.त्यामुळे या मद्याच्या खरेदी विक्रीला व मूल्यवृद्धीला ही मर्यादा आल्या. काजूबोंडे व मोहफुलांसह स्थानिक फळे,फुलांच्या मद्यार्कपासून जे मद्य तयार केले जाईल त्यास आता देशी ऐवजी विदेशी मद्य असा दर्जा देण्यात येणार असून अशा मद्यकापासून निर्मिती होणाऱ्या मद्यास “स्थानिक मद्य” असे संबोधले जाईल.त्यासाठी स्थानिक फळे,फुले इत्यादी पासून मद्यार्क उत्पादनासाठी परवाना देण्यासही मंत्रिमंडळाने मान्यता दिली.
काजूबोंडे,मोहफुलांसह फळे-फुले यापासून तयार होणाऱ्या मद्यापासून मद्य निर्मिती होईल व त्याची मूल्यवृद्धी होईल.फळे-फुले उत्पादकांनाही या निर्णयाने लाभ होईल.या शिवाय एक स्वतंत्र उद्योग राज्यात निर्माण होऊन रोजगार निर्मिती बरोबरच महसुलातही वाढ होईल असे राज्य सरकारला वाटते. एखाद्या फळाचा किंवा फुलांचा टंचाईमुळे कमी मद्यार्क उत्पादित झाल्यास किंवा गरजेनुसार एखाद्या फळा-फुलांच्या मद्यार्कत दुसऱ्या फळा-फुलांचे मद्यार्क मिश्रण देखील करता येईल.फळा-फुलांच्या मद्यार्क पासून उत्पादित होणाऱ्या माद्यावर उत्पादन शुल्काचा दर सवलतीचा राहील.
आज घडीला मोहापासून मद्य तयार करणारी एक ही कंपनी महाराष्ट्रात नाही. याचा अर्थ सरसकट गावठी भट्ट्या संबोधुन फळा-फुलांचे मद्य तयार करणाऱ्या आदिवासींना मंत्रिमंडळाच्या या निर्णयामुळे मोठे संरक्षण मिळेल आणि अशा मद्य निर्मितीचे स्थानिक उद्योग गावपातळीवर निर्माण होतील. आदिवासी भागात मोठ्या प्रमाणात गावोगावी मोहाची दारू घरगुती पद्धतीने तयार करून विकली जाते त्यामुळे मोहाच्या दारूला बाजारपेठ उपलब्ध झाल्यास आदिवासी बांधवांना रोजगार उपलब्ध होईल व त्यांचे स्थलांतर थांबेल.
आता परवान्याचे चे दोन प्रकार
सध्या महाराष्ट्रात मद्य विक्रीचा सरसकट एकच परवाना दिला जातो.त्याचे ठरलेले शुल्क भरून परवाना मिळाला की विक्रेता त्यावर देशी,विदेशी तसेच भारतीय बनावटीचे विदेशी मद्य विक्री करू शकतो.मात्र महसूल वाढीचा विचार करून या सर्वांची दोन भाग करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने घेतला.अतिउच्च दर्जाचा मद्य विक्री परवाना आणि उच्च दर्जाचा मद्य विक्री परवाना हे दोन परवाने असतील.दुकानाचे क्षेत्रफळ आणि उपलब्ध सुविधांचा विचार करून या श्रेणीत ठरवले जातील.विद्यमान परवानाधारकांना त्यांच्याकडील परवान्याचा दर्जा म्हणजेच श्रेणी वाढवण्याची मुभा दिली जाणार आहे.