
दैनिक चालु वार्ता, वृत्तसेवा
ठाणे :- जनसामान्यांचा नेता नाही तर जनसामान्यांचा आधार अशी कीर्ती असलेले आणि आपली संपूर्ण हयात सर्वसामान्य लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी खर्ची घालणारे ‘लोककारणी’ म्हणजे आनंद दिघे. आभाळाएवढं कर्तृत्व आणि व्यक्तिमत्त्व असलेल्या या लोकनेत्याचा जीवनप्रवास चित्रपटाच्या रुपात लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. प्रसाद ओकला देण्यात आलेला आनंद दिघे यांचा हुबेहुब लूक हा या चित्रपटाचा आकर्षण बिंदू ठरत आहे. त्यामुळे प्रदर्शनापूर्वीच या चित्रपटाची जोरदार हवा तयार झाली आहे. प्रसादचा लूक अगदी हुबेहूब झाल्याने शिवसैनिकांमध्येही या चित्रपटाबद्दल उत्सुकता आहे.
दरम्यान, ‘धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे’ या चित्रपटातील गाण्याचा लाँचिंग सोहळा गुरुवारी पार पडला. या कार्यक्रमासाठी यासाठी सिनेमातील संपूर्ण टीमने हजेरी लावली. कलाकारांसह नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे देखील उपस्थित होते. शिंदे स्टेजवर आले. आणि प्रसाद ओकला पाहताच भारावून गेले. स्टेजवर आल्या आल्या त्यांनी थेट प्रसाद ओकचे पाय धरले. पाया पडल्यानंतर दोघांनीही मिठी मारली आणि फोटो सेशनला सुरुवात झाली. हा क्षण सर्वांनीच जवळून अनुभवला. त्यामुळे काही काळ गाण्याच्या लाँचिंगसाठी आलेले शिवसैनिकही भारावून गेले. दिघे यांच्या रुपातील प्रसाद ओकने सर्वांचीच मनं जिंकली.
धर्मवीर चित्रपटाची घोषणा झाल्यापासूनच यात आनंद दिघे यांची भूमिका कोण साकारणार याबद्दल प्रेक्षकांच्या मनात कमालीची उत्सुकता होती. आनंद दिघेची दमदार व्यक्तिरेखा अत्यंत ताकदीचा अभिनेता प्रसाद ओक साकारणार असल्याचं स्पष्ट झालं. यानंतर प्रसादचा लूक सर्वांनाच प्रभावित करतोय. प्रवीण विठ्ठल तरडे यांचे दिग्दर्शन असलेल्या या चित्रपटाची निर्मिती अभिनेते मंगेश देसाई यांच्या साहिल मोशन आर्ट्स आणि झी स्टुडिओजने केली आहे.