
दैनिक चालु वार्ता
नांदेड जिल्हा दक्षिण प्रमुख
विश्वास खांडेकर
नांदेड :- महाराष्ट्र हा एक पवित्र भूभाग मानला जातो, याची ओळख संतांची भूमी ,ईश्वराची भूमी, श्रेष्ठ साधुसंतांची भूमी, अनेक क्रांतिकारकांची भूमी, समाजसेवकांची भूमी, सत्पुरुषांचे भूमी ,योगी पुरुषांची भूमी अशा नानाविध नावाने महाराष्ट्र ओळखला जातो. अशा या महाराष्ट्राला राजकारणाचा देखील फार मोठा वारसा आहे, परंतु काही काळापासून महाराष्ट्राचे राजकारण कोणत्या दिशेने चालले आहे हेच समजत नाही. आता राजकारण हे समाजकारण सोडून अर्थकारण झाले आहे की काय? असाच विचार सामान्य जनतेच्या मनात येऊ लागला आहे.
याविषयीची अधिक माहिती अशी की महाराष्ट्रातील राजकारणाला पूर्वी एक आदर्श होता, महाराष्ट्रातील राजकारण नीतिमत्ता, समाज भावना समाजाची शिस्त या सर्वांवर अवलंबून होते. परंतु गेल्या अनेक दिवसापासून जणू काही महाराष्ट्राचे राजकारण अगदी बदलून गेले आहे की काय असे वाटायला लागले आहे. ‘वाटण्याची आवश्यकताच नाही ते खरोखरच बदलले आहे’ महाराष्ट्रातील राजकारण आता सेवेपेक्षा मेंवा कसा प्राप्त होईल यावर अवलंबून झाले आहे. महाराष्ट्रात अनेक पक्ष आहेत आणि कुठलाही पक्ष समोर आदर्श उभा करेल असं वाटत नाही. कोणी जातीपातीच्या राजकारणावर अवलंबून आहे तर कोणी टीका-टिप्पणी च्या राजकारणावर अवलंबून आहे.
“भाड मे जाये जनता अपना काम बनता” हाच आदर्श ते समोर ठेवून चाललेले आहेत. याचे अनेक उदाहरणे आपल्याला पाहावयास मिळतात, कुठल्याही पक्षातील संपूर्ण नेते चांगले आहेत असे म्हणता येणार नाही. कुठल्या ना कुठल्या नेत्याचा कुठल्या ना कुठल्या घोटाळ्याशी संबंध दिसून येतो, तरी देखील तो घोटाळा लपण्यासाठी ते दुस-या पक्षावर आरोप करताना दिसून येतात. बर आरोप करणाऱ्यांची देखील घोटाळे आहेतच की !तेसुद्धा तांदळा प्रमाणे स्वच्छ आहेत का ?मूलभूत प्रश्नांना बगल देण्यासाठी एकमेकावर फक्त चिखलफेक करायची, एकमेकात कसे वाईट आहे हे दाखवण्याचा प्रयत्न चालला आहे. यामुळे जनतेचा कुठलाही प्रश्न सुटत नसून जनताही त्राहिमाम् त्राहिमाम् करत आहे.
जनतेचे अनेक प्रश्न आहेत लाईटचा प्रश्न आहे, शेतकऱ्यांचा प्रश्न आहे, समाजाचा प्रश्न आहे याशिवाय नोकरीधंद्याच्या एक प्रश्न आहे पण याचे यांना काही घेणेदेणे नाही. त्यांचे एवढेच म्हणणे आम्ही जे सांगतो तेच खरे आहे. आणि ते तुम्ही केले पाहिजे .महाराष्ट्रातील राजकारण आता अर्थकरण बनले आहे. यातून किती आणि कसा लाभ होईल तोदेखील मला! समाजाला नव्हे ,असेच पहावयास मिळत आहे .या महाराष्ट्राचे हाल मांडून ठेवले आहेत. सामाजिक उद्दिष्ट विसराचं, पण साधी नीतिमत्ता देखील पाळायला राजकारणी तयार नाही. प्रगतीचे लक्षण सोडा! पण आहे ते देखील राहू द्यायला ते तयार नाहीत. हा याचा दोष दाखवतो, त्याचा दोष दाखवतो, पण गेली अनेक वर्षे तुमच्या सर्वात सत्ता विभागली आहे. तुम्ही अनेक पक्षातून इकडे तिकडे जातात ,प्रत्येकाला थोडी ना बहुत सत्ता प्राप्त झालेली आहे.
या काळात तुम्ही काय केले हे विचारन्याचा अधिकार आता समाजाला उरलेलाच नाही. ज्याने हा विचारावा त्याच्यावरच नक्की कारवाई झाली म्हणून समजा. किंवा कोणी जर प्रखरतेने हा प्रश्न उभा केला असेल तर त्याच्याविषयी अनेक शंकाकुशंका निर्माण करून प्रश्नाला बगल कशी देता येईल हे अगदी व्यवस्थित पणे पाहिले जाते. अनेक पक्षांनी तर आपले मूळ धोरण सोडले आहे, आता कोणत्या पक्षाचा कोणता धोरणाशी संबंध होता हे देखील आता दुर्बीण लावून पहावे लागेल. कारण समाजाची काही घेणेदेणे नसणारे हे सर्वच राजकीय पक्ष एकाच माळेचे मणी आहेत असे म्हणावे लागेल. यात काही समाजकंटक देखील मागे नाहीत, ते बरोबर या संधीचा फायदा उचलतात .यात संधीसाधू देखील कमी नाही, तेदेखील अशा संधीचा फायदा उचलून राजकारणात आपला ‘प्रोग्रेस’ करण्याच्या मागे लागले आहेत. ही खरोखर हास्यास्पद गोष्ट आहे. आणि हे राजकारण मुळीच नाही.
हे राजकारणी आमच्यासाठी आदर्श तर सोडाच त्यांच्याकडे पहावे असे देखील वाटत नाही. अशा राजकारण्यांनी कृपा करून महाराष्ट्रावर उपकार करावेत, आणि एक तरी चांगले काम महाराष्ट्रसाठी करून दाखवावे. पाण्याचा प्रश्न, लोडशेडिंगचा प्रश्न कृपया सोडवा. लोडशेडींग आहे की नाही हे देखील स्पष्टपणे सांगण्यास तयार कोणी नाही. आता राजकारण म्हणजे “आईचे पीठ बाईचा मीठ कर ग रानी संसार नीट” अशा म्हणीप्रमाणे चालले आहे. फक्त आजूबाजूचा सपोर्ट घ्यायचा आणि आम्ही केलेले कार्य किती पण योग्य आहे हे स्पष्ट करत राहायचे. गेल्या अनेक वर्षापासून अशीच भूमिका अनेक पक्षांनी धरली आहे. प्रत्येक पक्षाच्या पत्रकार परिषदा होतात. पत्रकारांनी एखादा वाकडा प्रश्न विचारला तर लगेच तो पत्रकार किती खराब आहे, किंवा ती बातमी नको दाखवू म्हणून त्याच्यावर दबाव आणला जाणार. अशा वेगवेगळ्या गोष्टी महाराष्ट्रात बघावयास मिळत आहेत.
समाजाची सामाजिक आणि जातिची गोष्टी लक्षात घेऊन त्यांचे सण, धर्म, पंथ यांचा उपयोग करून आपला कार्यक्रम अगदी व्यवस्थित पणे ते चालवत आहेत. यात तरुण आहेत,ते नकळत सामील झाली आहेत. परंतु सर्वात जास्त नुकसान तर या येणाऱ्या तरुण पिढीचे आहे. होतकरू आत्मविश्वासू अनेक तरुण या राजकारणाच्या निर्णयांमुळे दिशा हरवून बसले आहेत. यांना दिशा दाखवणारा आता कोणीतरी निर्माण होईल का ?असेच साकडे टाकावे लागेल. आणि महाराष्ट्र कधी सुधारेल? यात मुलभूतरित्या कधी बदल होतील ?आता हेच पाहावे लागेल ? या बदलाच्या आशेवरच पूर्ण समाज अजून तग धरून आहे. तरीही अशा सुटने किंवा सोडून देणे हे पूर्णपणे राजकारण्यांच्या आणि सरकारच्या हाती आहे. कृपया याकडे लक्ष द्यावे अशी समाजातून ओरड होत आहे.