
दैनिक चालु वार्ता, वृत्तसेवा
नवी दिल्ली :- पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या रविवारी जम्मू-काश्मीरला भेट देणार असून, या दौर्यात ते सुमारे 20 हजार कोटी रुपयांच्या प्रकल्पांची पायाभरणी करणार आहेत. यावेळी मोदी यांच्या हस्ते बेनिहाल-काझिगुंड बोगद्याचे लोकार्पणही होणार आहे. या बोगद्यामुळे बेनिहाल आणि काझिगुंड हे दोन भाग सर्व ऋतूंमध्ये एकमेकांशी जोडले जाणार आहेत. या दौर्यात पंतप्रधान मोदी राष्ट्रीय पंचायती राज दिवस कार्यक्रमातही सहभागी होतील तसेच तिथून ते आभासी पद्धतीने देशभरातील ग्राम सभांना संबोधित करतील.
याशिवाय, ते सांबा जिल्ह्यातील पल्ली पंचायतलाही भेट देणार आहेत, अशी माहिती पंतप्रधान कार्यालयाने जारी एका निवेदनातून दिली. देशातील प्रत्येक जिल्ह्यात 75 जलाशये विकसित करण्याच्या महत्त्वाकांक्षी योजनेच्या अनुषंगाने पंतप्रधान मोदी येथे अमृत सरोवर या नव्या योजनेचाही शुभारंभ करणार आहेत. जम्मू-काश्मीरचा दौरा पूर्ण केल्यानंतर नरेंद्र मोदी सायंकाळी मुंबईत येणार आहेत. अलिकडेच त्यांना पहिला लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार जाहीर झाला. हा पुरस्कार ते स्वत: उपस्थित राहून स्वीकारणार असल्याचे या निवेदनात म्हटले आहे.