
दैनिक चालु वार्ता
सिल्लोड प्रतिनिधी
सुशिल वडोदे
सिल्लोड :- शहरात चोरट्यांनी प्रचंड धुमाकूळ घातला. काही ठिकाणी महिलांच्या पर्स तर काही जणांचे मोबाईल चोरीला गेले आहेत. दुचाकीला लटकविलेली पर्स चोरट्यांनी लंपास केली असून त्यात ६० हजार रुपये किमतीचे एक नेकलेस व रोख ५०० रुपये असा ऐवज होता. ही घटना शहरातील भराडी फाट्यावर घडली. निर्मलाबाई दत्तात्रय फुले (२६) ही महिला दुचाकीला (क्र. एमएच २० बीएच ५४३७) पर्स लटकावून भावासोबत भराडी फाट्यावर रसवंतीवर गेली होती. रस पित असतानाच या महिलेची नजर चुकवून चोरट्यांनी ती पर्स लंपास केली.
६० हजार रुपये किमतीचा एक नेकलेस व रोख ५०० रुपये असा ऐवज त्यात होता. या प्रकरणी निर्मलाबाई यांनी दिलेल्या तक्रारीवरून शहर पोलिसांनी चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. शहरात आठवडे बाजार असतो. या बाजारातून चोरट्यांनी दोन मोबाईल, तर अन्य एका महिलेची पर्स लंपास केली. तसेच आंबेडकर चौकातून एक मोबाईल चोरीला गेला आहे. या प्रकरणी सिल्लोड शहर पोलिसांनी दोन मोबाईल व एक पर्स चोरीला गेल्याची नोंद केली आहे.