
दैनिक चालु वार्ता
पुणे प्रतिनिधी
शाम पुणेकर
पुणे :- यावर्षी उन्हाळा अधिक उष्ण ठरत आहे. त्याचा फटका फळांचा राजा असलेल्या आंब्याला बसला आहे. उष्णता वाढल्याने डझनापैकी एक ते दोन हापूस आतून खराब होत आहे. तसेच, फळाच्या रंगासह त्याची चवही बदलली आहे. देठाजवळ आंबा काळा होण्याचे प्रमाणही वाढले आहे. राज्यातील सरासरी तापमान चाळीस अंशावर गेल्याने फळांचा राजा असलेल्या हापूसला सध्या त्याची चांगलीच झळ बसत आहे. हंगामाच्या सुरुवातीलाच लहरी वातावरणामुळे कोकणातील हापूस आंब्याचे मोठे नुकसान झाले. त्यामुळे, पहिल्या टप्प्यात झाडांवर अवघी 25 टक्केच फळे राहिली.
याकाळात, बाजारातील आवक घटून हापूसला चांगले भाव मिळत होते. तर,मार्केटमध्ये आंबा दाखल झाल्यानंतर आवश्यकतेपेक्षा जास्त तापमान असल्याने आंबा गरम होऊन कोईपाशी खराब होण्याचे प्रमाण वाढले आहे. साधारण वातावरण असताना आंबा तयार होण्यासाठी ताडपत्रीने झाकून ठेवणेचे प्रकार व्यापारी वर्गाकडून करण्यात येतात. मात्र, सध्या वाढलेल्या अती उष्णतेमुळे आंब्याच्या पेट्यांना फॅनद्वारे हवा देऊन थंड ठेवणे सुरू आहे.
– पुणे मार्केट यार्ड व्यापारी.