
दैनिक चालु वार्ता
अंबाजोगाई तालुका प्रतिनिधी
बालाजी देशमुख
सिरसाळा- आम्ही कल्याणकारी की अकल्याणकारी हे लोक ठरवतील. पण, शेतकऱ्यांचे आशास्थान वैद्यनाथ कारखाना सुरु होणार का? हे जनतेला सांगा, एखादे विट वैद्यनाथ बाबतही करा, असा टोला सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे यांनी लगावला. मागील वर्षी मार्च महिन्यात लॉकडाऊन लागले तेव्हापासून जनतेतून गायब असलेले विरोधक दसरा-दिवाळी बघून येतात. एक दिवस लोकांमध्ये गेले की दुसऱ्या दिवशी सर्दी खोकला येतो आणि परत • निघून जातात, अशी टीका देखील श्री. मुंडे यांनी केली. सिरसाळा (ता. परळी) येथे गुरुवारी (ता. १४) एका कार्यक्रमात श्री. मुंडे बोलत होते. बीडमध्ये शेतकऱ्यांच्या मदतीसाठी भाजपने केलेल्या धरणे आंदोलनात पंकजा मुंडे यांनी धनंजय मुंडे यांच्यावर अकल्याणकारी नेते अशी टिका करुन जिल्ह्यात माफियाराजला सत्ताधाऱ्यांचे पाठवळ असल्याचे सांगितले होते. त्याला धनंजय मुंडे यांनी प्रत्युत्र दिले. श्री. मुंडे म्हणाले, आम्ही पहिल्या दिवसापासून मदत करण्याच्या भूमिकेत आहोत. शेकडो रुग्णांना कोविड काळात मदत केली. हजारो कुटुंबांना अन्नधान्य पुरवले. हजारोंना मोफत रेमडेसिव्हिर उपलब्ध करून दिले. त्यात काही भाजपचे कार्यकर्तेपण होते. पण आम्ही केलेली मदत या हाताची त्या हाताला कळू देत नाही असा आमचा स्वभाव आहे. शेतकऱ्यांचे आशास्थान असलेला वैद्यनाथ साखर कारखाना वाईट अवस्थेत आहे. नवी मुंबईच्या मार्केट कमिटीप्रमाणे येथील मार्केट कमिटीचा देखील राज्यभरात नावलौकिक होईल असेही श्री. मुंडे म्हणाले. आमदार संजय दौंड, जिल्हा परिषदेचे गटनेते अजय मंडे, शिवाजी सिरसाट आदी उपस्थित होते.