
दैनिक चालु वार्ता, वृत्तसेवा
केयूरा न विभूषयन्ति पुरुषं हारा न चन्द्रोज्ज्वलाः
न स्नानं न विलोपनं नं कुसुमं नालड्कृता मूर्धजाः ।
वाण्येका समलड़करोति पुरुषं या संस्कृता र्धायते
क्षीयन्ते खलु भूषणानि सततं वाग्भूषणं भूषणम् ॥
याचा सारांश की वाणी हीच माणसाची शोभा वाढवते म्हणजे उपरोक्त सुभाषित हेच शिकवून जाते की, माणसाला त्याचे सुदृढ शरीर शोभा वाढवत नाही किंवा हार, तुरे याचे सत्कार स्विकारले तर शोभा वाढत नाही किंवा केस रचना बदलल्याने शोभा वाढत नाही तर कोणत्याही माणसाची शोभा वाढते त्याच्या वाणीमुळे त्याच्या चांगल्या बोलण्यामुळे. सध्याचे युग हे डिजीटलयुग म्हणजेच सोशल मिडीया हा प्रमुख स्त्रोत जिकडे-तिकडे जगभर पाहायला मिळतोय. हल्ली लहान मुलांच्या झुम अॅपच्या क्लासपासून ते मोठ मोठी नेते, विचारवंत, अभ्यासक,सामाजिक कार्यकर्ते लाईव्ह येण्यापर्यंत सोशल मिडीयाचा वापर मोठ्या प्रमाणात होत आहे.
त्या अनुषंगाने एखाद्या विषयावर प्रतिक्रिया येतातच परंतु प्रतिक्रिया किंवा मत व्यक्त करत असतांना भावनेच्या, अहंकाराच्या भरात असभ्य वक्तव्ये केली जातात आणि याचा परिणाम सर्वत्र होतो. देशाला, राज्याला संत-महंतांची, महापुरुषांची संस्कृती लाभलेली आहे म्हणजेच सभ्यता हीच संस्कृती आहे याचा विसर पडून आज येथे बेधडक बेताल वक्तव्ये करुन सामाजिक वातावरण ढवळल्या जाते ज्यामुळे सर्वसामान्यांच्या रोजच्या जीवनावर याचा परिणाम होताना दिसून येतो. भारतीय राज्यघटनेने दिलेल्या मुलभूत हक्कानुसार प्रत्येकाला व्यक्तीस्वातंत्र्य, मतस्वातंत्र्य असल्याने कोणी काय मत व्यक्त केले पाहिजे यावर कोणीही निर्बंध आणू शकत नाही याचा अर्थ असा नाही की आपण असभ्य बोलले पाहिजे.
अनेक विषयांवर आपली भूमिका मत वेगळे असू शकते, अनेक विषय आपल्याला अमान्य असू शकतात आणि जे विषय ज्या भूमिका अमान्य आहेत त्यावर मत नोंदवत असतांना सभ्यता ही पाळलीच गेली पाहिजे याचे गांभीर्य प्रत्येकाने ठेवावे. मतभेद, विचार भेद असणं स्वाभाविक आहे अगदी जगातील सोडा आपले जे आप्त स्वकीय म्हणून आपण ज्यांना मानतो/संबोधतो अगदी त्यांच्यामध्ये सुद्धा परस्पर मतभिन्नता आहे एकमत आणि एक विचार हे हल्ली समाजात, कुटुंबात,नातेसंबंधात क्वचित दिसतात ,मग मत भिन्नता आहे बरोबर आहे पण मतभिन्नता व्यक्त करताना सभ्यता पाळलीच पाहिजे.
मत व्यक्त करण्याचा अधिकार प्रत्येकाला अधिकार आहे म्हणून अविवेकी, अवास्तव मत व्यक्त करून संवग लोकप्रियता मिळविण्यासाठी हल्ली सभ्यता धुळीस मिळतानाचे चित्र दिसत आहे.
आपण व्यक्त केलेल्या मतावर आपले सामाजिक मुल्यमापन होत असते, आपली सामाजिक राजकीय उंची अनुभव आणि अभ्यास याचा समन्वय साधून मत व्यक्त केले पाहिजे हल्ली अगदी कोणीही उचलली जीभ लावली टाळाला या उक्तीप्रमाणे आपला वैचारिक स्तर सोडून मत व्यक्त करतांना दिसत आहेत.
अनेक संत महंत महापुरुष यांनी वाणी आणि पाणी जपून वापरा हा सल्ला दिला परंतु सध्या लोक वाणी आणि पाणी हे निष्काळजीपणाणे वापरत आहेत आणि यामुळे अनेक सामाजिक तेढी महापुरुषांच्या अवमान राजकिय, सामाजिक व्यक्तिमत्त्व बद्दल शिवराळ भाषा वापरणे हे कोणत्या विद्वत्तेच लक्षण आहे वास्तविक विचारांचा प्रभाव हा विद्यमान किंवा भविष्यातील पिढीला कामी येण्या सारखा असला पाहिजे महाराष्ट्र हा सुसंकृत आणि संतांची भूमी म्हणून ओळखला जातो.
ज्या भुमित हिमालयाच्या उंचीची स्वयंभु ज्ञानपीठ म्हणजे आपल्या महाराष्ट्राच्या पावन भूमीत संत ज्ञानेश्वर महाराज, संत निवृत्तीनाथ महाराज, संत मुक्ताबाई, संत तुकाराम महाराज, संत एकनाथ महाराज, संत रामदास स्वामी, संत गाडगे महाराज, संत गोरा कुंभार, संत चोखा मेळा, संत नामदेव महाराज, संत कान्होपात्रा, संत गजानन महाराज, संत स्वामी समर्थ, साई बाबा, संत अवजीनाथ महाराज, संत सद्गुरु वामनभाऊ महाराज, राष्ट्र संत भगवानबाबा असे संत महापुरुष, सिद्धपुरुष, होऊन गेले आणि त्यांनी संस्काराची शिदोरी देतांना सांगितले की, वाचा, मन शुद्ध ठेवा , वाणी आणि पाणी जपून वापरा म्हणून आपलं मत भुमिका विचार व्यक्त करताना सभ्यता ही संस्कृती आहे याची जाणीव जागृती असली पाहिजे.
गणेश खाडे
संस्थापक वंजारी महासंघ, महाराष्ट्र
वंजारी समाज इतिहास अभ्यासक व लेखक
बालसंस्कार शिबिर, अध्यात्मिक मार्गदर्शक
मो.9011634301