
दैनिक चालु वार्ता
शिरपूर प्रतिनिधी
महेंद्र ढिवरे
शिरपूर :- रस्ते आणि पुलांची कामे दळणवळणाच्यादृष्टीने महत्वाची असतात. त्यामुळे वरखेडी-कुंडाणे दरम्यान पांझरा नदीवर होणार्या पुलामुळे वरखेडे आणि परिसरातील एकूण 15 गावांच्या विकासाला चालना मिळून ही गावे प्रगतीपथावर असतील. असे प्रतिपादन धुळे ग्रामीणचे आमदार कुणाल पाटील यांनी केले. त्यांच्या विशेष प्रयत्नातून वरेखडी-कुंडाणे दरम्यान पांझरा नदीवर मोठ्या पुलाचे बांधकाम मंजूर करण्यात आले असून या कामाचे भूमीपूजनप्रसंगी ते बोलत होते.
धुळे ग्रामीण मतदारसंघातील वरखेडे-कुंडाणे दरम्यान पांझरा नदीवर मोठ्या पुलाचे बांधकाम व्हावे म्हणून आ.कुणाल पाटील यांनी विशेष प्रयत्न करून पूलासाठी निधी मंजुर करून आणला. या कामाचे भुमीपूजन आ.कुणाल पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. जोड रस्त्यासह पूलाच्या बांधकामासाठी एकूण 8 कोटी रुपयाचा निधी मंजूर करण्यात आला आहे. वरखेडी येथे पांझरा नदीवर पूलाचे बांधकाम करण्याचे निवडणूकीत दिलेले आश्वासन रविवारी दि.24 पूर्ण करण्यात आले आहे.
धुळे महापालिकेत वरखेडी गावाचा समावेश झाला असल्याने रस्ते आणि पूल हे विकासाचे महत्वाचे मार्ग आहेत आणि त्यातूनच मग दळणवळणाच्या सुविधा निर्माण होवून या भागाच्या विकासाला गती मिळणार आहे. या पुलामुळे वरखेडी परिसरातील 15 पेक्षा अधिक गावांच्या प्रगतीसाठी चालना मिळणार असल्याचे आ.पाटील यांनी यावेळी सांगितले. धुळे तालुक्याच्या विकासाला गती मिळावी आणि नागरीक, शेतकरी, वाहनधारकांची गैरसोय दूर व्हावी म्हणून पांझरा नदी आणि बोरी नदीवर पुलांचे बांधकामांना प्राधान्य दिले असल्याचे आ.कुणाल पाटील यांनी यावेळी नमूद केले.
पांझरा नदीवर कुंडाणे-वार, मोराणे येथे पूलांचे बांधकाम झालेले पूल आणि वरखेडीजवळ नुकतेच भुमीपूजन झालेला पूल तसेच बोरी नदीवरील शिरुडजवळील पूर्ण झालेला पूल, निमगुळ गावाजवळ प्रगतीपथावरील पूल, धाडरे गावाजवळ मंजुर झालेला पूल अशा एकूण 6 पुलांची निर्मीती होणार आहे. त्यापैकी काही पुलांचे काम पूर्ण झाले असल्याचे देखील त्यांनी सांगितले.