
दैनिक चालु वार्ता
जव्हार प्रतिनिधी
– विकासकामे रेंगाळलेल्या अवस्थेत
जव्हार :- सुवर्ण काळ पूर्ण झालेल्या नगर परिषदेला पूर्ण वेळ मुख्याधिकारी नसल्याने पर्यटनाचा ब दर्जा लाभलेल्या जव्हार शहरातील विकास कामे खोळंबली आहेत. शहरात सगळ्याच प्रभागांत स्वच्छता,अर्धवट सुरू असलेली विकास कामे या सगळ्यांतून नागरिकांना काहीही चूक नसताना प्रचंड मानसिक त्रास सहन करावा लागत आहे.शिवाय कोणत्याही कामासाठी नगर पालिकेत गेल्यावर हे विभाग प्रमुख इथे गेलेत,कुणी कामस्थळी गेल्याचे सांगून घरी जाऊन आराम करीत आहे,तर कुणी मंदिरात गेले, कुणी गप्पा ठोकण्यात व्यस्त असल्याची माहिती शुक्रवारी काही नगरसेवकानी बोलताना दिली आहे.असे बेजबाबदार काम सुरू असल्याने पूर्णवेळ मुख्याधिकारी कधी मिळेल असा सवाल शहरातील नागरिक करीत आहेत.
शहरासाठी महत्वाकांक्षी प्रकल्प असणारी खडखड नळ पाणीपुरवठा योजना अजून पूर्ण झाली नाही,शिवाय प्रभागनिहाय पाईपलाईन पाईप संपल्याचे कारण सांगून रखडली आहे,काही महिन्यात सध्याच्या नगरसेवकांचा कार्यकाळ समाप्त होणार आहे.मग अजून किती नगर वासीयांनी धीर धरावा हा गहन प्रश्न अनुत्तरित आहे,त्यातच नळपाणी योजनेचे काम धीम्या गतीने सुरू असून प्रशासनाला या कामाबाबत कोणतेही गांभीर्य असलेले दिसत नाही,जवळपास चार वर्षे पूर्ण झाली आहेत तरी अजुन नळपाणी योजना प्रगती पथावर असल्याचे बोलले जात आहे.
शहरात मुख्य रस्त्याला प्रचंड खड्डे पडले असून रस्त्याची कामे होतील अशी भाबडी आशा ठेवुन नागरिक वाट पाहत आहेत.रस्त्यावरील खड्ड्यात लहान बालके,महिला तसेच वृद्ध पडून जखमी देखील झाले आहेत,धुळीमुळे आजारपण वाढेल आहे,पण प्रशासन शासन भानावर नसल्याची परिस्थिती जव्हार नगर परिषद मध्ये असल्याचे चित्र आहे. विध्यमान मुख्याधिकारी हे डहाणू साठी चे पूर्णवेळ मुख्याधिकारी असून आठवड्यात केवळ १ ते २ दिवस उपस्थित रहात आहेत,त्यामुळे नगर परिषदेच्या विभाग प्रमुखाना धाक कुणाचा राहिला नाही,पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री दादाजी भुसे यांनी जव्हारकडे लक्ष देण्याची गरज असल्याचे नागरिकांत बोलले जात आहे.