
दैनिक चालु वार्ता, वृत्तसेवा
नवी दिल्ली :– सार्वजनिक क्षेत्रातील आघाडीच्या बँक ऑफ महाराष्ट्रवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे.
केंद्रीय बँकेद्वारे जारी करण्यात आलेल्या निर्देशांची अंमलबजावणीत कुचराई करण्यात आल्याचा ठपका महाराष्ट्र बँकेवर ठेवण्यात आला आहे. रिझर्व्ह बँकेने तब्बल 1.12 कोटींचा दंड बँकेला ठोठावला आहे.
केवायसी संबंधित निर्देशांची अंमलबजावणी महाराष्ट्र बँकेने पूर्ण क्षमतेने केली नसल्यामुळे दंडात्मक कारवाई करण्यात आल्याचे वृत्त आहे. रिझर्व्ह बँकेने यासंदर्भातील प्रकटीकरण जारी केले आहे. त्यामध्ये कारवाई संबंधित तपशीलाचा खुलासा करण्यात आला आहे. रिझर्व्ह बँकेच्या दिशानिर्देशांच्या निकषांवर आधारित चौकशीचे स्वरुप होते. यापूर्वी रिझर्व्ह बँकेने सरकारी क्षेत्रातील कर्जदार सेंट्रल बँक ऑफ इंडियावर ग्राहकांच्या सुरक्षेचे उल्लंघन केल्यामुळे 36 लाखांचा दंड ठोठवला होता.
महाराष्ट्र बँकेसोबतच राजकोट नागरी सहकारी बँकेला बारा लाख रुपयांचा दंड ठोठविण्यात आला आहे. ठेवींवर व्याजाच्या बाबतीत निकषांची अंमलबजावणी न करण्यामुळे दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. रिझर्व्ह बँकेने चंदीगढ स्थित हरियाणा स्टेट को-ऑपरेटिव्ह अॅपेक्स बँकवर 25 लाखांचा दंड ठोठवला आहे. गृह वित्ताच्या बाबतीत निर्देशांचे पालन केल्याचे बँकेच्या पाहणीत दिसून आलं आहे.