
दैनिक चालु वार्ता, वृत्तसेवा
मुंबई :– भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी भाजपच्या शिष्टमंडळासह दिल्लीत केंद्रीय गृहसचिवांची भेट घेतली. या भेटीवर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी टीका करत राष्ट्रपती राजवट लावायचीच असेल, तर ती उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्र दोन्हीकडे एकाच वेळी लावावी, असा टोलाही लगावला. मुंबईत आयोजीत पत्रकार परिषदेत संजय राऊत यांनी भाजपवर टीका केली. संजय राऊत म्हणाले, उत्तर प्रदेशात 17 बलात्कार झाले आहेत. त्याचीही माहिती केंद्रीय गृहसचिवांना द्यावी. गेल्या दोन वर्षात अनेकदा भाजपचे शिष्टमंडळ केंद्रीय गृहसचिवांना अनेक वेळा भेटले.
महाराष्ट्रातील कायदा सुव्यवस्थेबाबत तक्रारी असतील, तर तुम्ही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री यांची आधी भेट घ्या, असा सल्लाही त्यांनी यावेळी दिला आहे. तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही राज्याच्या गृहमंत्र्यांना भेटायला हवे. मुख्यमंत्र्यांना भेटायला हवे. तुम्ही जर थेट केंद्रीय गृहसचिवांची भेट घेत असल्यास उत्तर प्रदेशमध्ये झालेलया 17 बलात्काराविषयीही माहिती द्यावी. राष्ट्रपती राजवट लावायचीच असेल तर यूपी आणि महाराष्ट्रात एकत्रच लावा, असे आवाहनही त्यांनी केले.