
दैनिक चालु वार्ता, वृत्तसेवा
वैशाख महिन्यातील कृष्ण पक्षामध्ये येणाऱ्या वरुथिनी एकादशीचे माहात्म्य भविष्योत्तर पुराणामध्ये श्रीकृष्ण आणि राजा युधिष्ठिर यांच्या संवादामध्ये सांगण्यात आले आहे.एकदा युधिष्ठिर महाराजांनी भगवान श्रीकृष्णांना विचारले, “हे वासुदेव, वैशाख महिन्यातील कृष्ण पक्षामध्ये येणाऱ्या एकादशीचे नाव काय आहे ? आणि या एकादशी व्रताचे पालन केल्याने काय फळ मिळते आणि तिचे माहात्म्य काय आहे. भगवान श्रीकृष्णांनी सांगितले, “प्रिय राजन् त्या एकादशीचे नाव आहे “वरुथिनी एकादशी.” तिच्या पालनाने या जन्मी तसेच पुढील जन्मी सुद्धा सौभाग्य प्राप्त होते.
या व्रताच्या प्रभावामुळे व्यक्ती सर्व पापांपासून मुक्त होते तसेच त्यास वास्तविक आनंद प्राप्त होऊन तो भाग्यवान बनतो. या व्रताच्या पालनाने राजा मांधातांनी मुक्ती प्राप्त केली. त्याचप्रमाणे अनेक राजे जसे की महाराज धुंधुमार देखील मुक्त झाले. केवळ वरुथिनी एकादशी व्रताचे पालन केल्याने व्यक्तीला १०००० वर्षे तपस्या केल्याचे फळ मिळते. सूर्यग्रहणाच्या वेळी कुरुक्षेत्रावर सुवर्ण दान केल्याने मिळणारे पुण्य केवळ वरुथिनी एकादशी व्रत पालनाने प्राप्त होते.”
हे राजन् ! अश्वदानाहून श्रेष्ठ गजदान आहे, गजदानाहून श्रेष्ठ भूमीदान आहे, भूमी दानाहून श्रेष्ठ तीळदान आहे, तीळ दानाहून श्रेष्ठ सुवर्णदान आहे, आणि सुवर्ण दानाहून श्रेष्ठ अन्नदान आहे. हे राजन् ! अन्नदान केल्याने पितर, देवता आणि सर्व प्राणीमात्र प्रसन्न होतात.
बुध्दीमान लोकांना माहिती आहे की, कन्यादान हे अन्नदानाइतकेच पुण्यदायक आहे.स्वतः भगवंतच सांगतात की, अन्नदान हे गोदानाइतकेच श्रेष्ठ आहे. सर्वांत श्रेष्ठ म्हणजे विद्यादान आहे.” केवळ वरुथिनी एकादशी व्रताचे पालन केल्याने सर्व प्रकारचे दान दिल्याचे पुण्य प्राप्त होते. आपल्या चरितार्थासाठी जो कन्येला विकतो तो सर्वात नीच मनुष्य समजला जातो आणि प्रलयापर्यंत त्या व्यक्तीला नरकात दुःख भोगावे लागते. त्यामुळे कोणीही कधीच आपल्या मुलीच्या बदल्यात धन स्वीकारू नये. जी व्यक्ती असे करते तिला पुढील जन्म मांजराचा मिळतो. परंतु आपल्या सामर्थ्याप्रमाणे जी व्यक्ती सुवर्णालंकारासहित सुशोभित करून योग्य वरास आपली कन्या देतो, त्याच्या पुण्याची गणना ठेवण्यास यमराजाचे सचिव चित्रगुप्त देखील असमर्थ ठरतात.