
दैनिक चालु वार्ता
तालुका प्रतिनिधी
नवनाथ यादव
परंडा :- तालुक्यातील सोनारी येथील श्री काळभैरवनाथाच्या चैत्र यात्रेस मंगळवार दि 26 पासून प्रारंभ होत आहे. यानिमित्त लाखो भाविक श्रीक्षेत्र सोनारीत दाखल होणार असल्याने भाविकांच्या सुविधेसाठी प्रशासन, ग्रामपंचायत व मंदिर ट्रस्ट सज्ज झाली आहे. चैत्र वद्य त्रयोदशीला होणारी यात्रा श्री काळभैरवनाथाची सर्वात मोठी यात्रा असते .यासाठी महाराष्ट्रासह आंध्र प्रदेश, कर्नाटक, गोवा या राज्यातील लाखो भाविक उपस्थित असतात. 23 एप्रिल रोजी रात्री 12 वाजता देवाचा विवाह सोहळा संपन्न झाला.
26 एप्रिल रोजी एकादशी दिवशी यात्रा प्रारंभ होत आहे. 27 एप्रिल रोजी देवाला महाअभिषेक व महानैवेद्य दाखवला जातो. दि 28 एप्रिल रोजी पहाटे महाअभिषेक, दुपारी बारा वाजता महानैवेद्य झाल्यानंतर रथाच्या मिरवणुकीस वाजत गाजत प्रारंभ होणार आहे. याच दिवशी सायंकाळी देवाची आरती व मानकरी लोकांना प्रसादाचे वाटप करण्यात येणार आहे. आरोग्य विभाग सज्ज यात्राकाळात भाविकांच्या आरोग्यासाठी आरोग्य विभागाकडून जिल्हा परिषद शाळेत 26 एप्रिल ते 29 एप्रिल दरम्यान 17 आरोग्य कर्मचारी व 2 ॲम्बुलन्स उपलब्ध करण्यात आला आहे.
तगडा पोलिस बंदोबस्त…
यात्रा काळात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलीस प्रशासनाने सुरक्षेच्या दृष्टिकोनातून 8 पोलीस अधिकारी, 100 पोलीस कर्मचारी, 150 होमगार्ड, 10 ट्राफिक पोलीस कर्मचारी, दंगल नियंत्रण पथक, बॉम्ब शोध पथक असा तगडा बंदोबस्त उपविभागीय पोलीस अधिकारी डी.एस.डंबाळे व सपोनी आशिष खांडेकर यांच्या नेतृत्वाखाली तैनात करण्यात आला आहे.
महसुलचे आपत्ती व्यवस्थापनही सज्ज…
महसूल विभागातर्फे यात्राकाळात आपत्ती व्यवस्थापनासाठी 2 नायब तहसीलदार, 5 मंडळ अधिकारी, 25 तलाठी व 20 कोतवाल यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यासह अनुचित प्रकार टाळण्यासाठी 2 अग्निशमनच्या गाड्या तैनात करण्यात आल्या आहेत. यात्रेतील कर वसुलीसाठी व पाणी व्यवस्थापन करण्यासाठी पंचायत समितीतर्फे 3 विस्ताराधिकारी व 7 अतिरिक्त ग्रामसेवकांची नियुक्ती करण्यात आली आहे.
भव्य असे कुस्ती मैदान….
उस्मानाबाद जिल्ह्यातील सोनारी गाव हे पैलवानांनाचे गाव म्हणून ओळखले जाते. गावातील यात्रेनिमित्त भव्य असे कुस्ती मैदानाचे दि 29 एप्रिल रोजी आयोजन केले आहे. दि 29 रोजी सकाळी 11 ते 1 या वेळेत कुस्त्या नेमण्यात येणार अहेत तरी पैलवानांनी वेळेत हजर राहावे असे आवाहन यात्रा कमिटी अध्यक्ष संभाजी सुरवसे यांनी केले आहे.
सर्व स्थानकातून ज्यादा बस गाड्या…
यात्राकाळात राज्य परिवहन मंडळाच्या वतीने ज्यादा बसेस धावणार आहेत. उस्मानाबाद विभागातील सर्व आगाराच्या बस स्थानकातून 65 बस भाविकांना बस सेवा मिळणार आहे. सोलापूर, लातूर, बीड, नगर या आगारातील ज्यादा बसेस ही यात्रेनिमित्त सोडण्यात आल्या असून सोनारीत येणाऱ्या यात्रेकरूंच्या सुविधेसाठी तात्पुरते शेड उभारण्यात येत आहे. गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी बस स्थानकावर सुरक्षेसंबंधी ची व्यवस्था ठेवण्यात येणार आहे दर पाच मिनिटाला बसफेऱ्या उपलब्ध होणार असल्याचे परिवहण मंडळाकडून सांगण्यात आले.
महावितरण ही सज्ज….
यात्राकाळात विद्युत पुरवठा पंडित न होण्यासाठी व इतर अनुचित प्रकार घडू नयेत यासाठी महावितरण कार्यालयाकडून 4 अभियंता, 14 विद्युत तंत्रज्ञ (लाईन स्टाफ), तीन ऑपरेटर यांची नियुक्ती करण्यात आले.