
दैनिक चालु वार्ता, वृत्तसेवा
मुंबई :– सत्ता येते, सत्ता जाते मात्र त्यामुळे अस्वस्थ होण्याची गरज नाही असा अनुभवाचा सल्ला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी विरोधकांना दिला. शरद पवार यांनी राज्यातील घसरलेल्या राजकीय पातळीबाबत माध्यमांसमोर आपली प्रतिक्रिया मांडली. शरद पवार म्हणाले की, “मी राज्यात अनेक वर्ष काम केलं. तेव्हा बाळासाहेब ठाकरेंसोबत माझे जाहीर मतभेद असायचे. त्यावेळी एकमेकांसाठी शब्द वापरण्यात कोणतीही काटकसर आम्ही दोघांनीही केली नाही. परंतु बैठक संपल्यानंतर आम्ही पुन्हा एकत्र भेटायचो. औरंगाबादच्या एका सभेतही आम्ही एकमेकांच्या वक्तव्यावर तुटून पडलो होतो.
पण नंतर ज्येष्ठ नेते बापूसाहेब काळदाते, अनंतराव भालेराव यांच्यासोबत नंतरची संध्याकाळ जायची. तेव्हा सभेत बोलल्या गेलेल्या गोष्टींचे स्मरणही आम्ही करत नसू. स्व. यशवंतराव चव्हाण यांच्यापासून राजकारणाची ही संस्कृती महाराष्ट्रात होती. मात्र आता दुर्दैवाने ती हरवत चालली आहे.” यशवंतराव चव्हाण, आचार्य अत्रे, एस. एम. जोशी यांची विधिमंडळातील चर्चा अत्यंत टोकाची असायची. पण ही मंडळी चर्चा संपल्यानंतर पुन्हा एकत्र बसून राज्याच्या हिताचा विचार करायची. मात्र अलीकडच्या काळात दुर्दैवाने नाही त्या गोष्टी बघायला मिळत आहेत, अशी खंत शरद पवार यांनी यावेळी व्यक्त केली.