
दैनिक चालु वार्ता
पुणे प्रतिनिधी
अ. दि. पाटणकर
कोंढणपुर :- शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या आणि उत्तमोत्तम विद्यार्थी घडविण्याची परंपरा असणाऱ्या शिवगंगा खोऱ्यातील शिवभूमी शिक्षण मंडळाच्या नरवीर तानाजी मालूसरे विद्यालयातील १९९४ साली दहावीत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांकडून नुकताच कल्याण येथील एका रिसॉर्टमध्ये माजी विद्यार्थी मेळावा व कृतज्ञता सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाची सुरुवात नरवीर तानाजी मालुसरे विद्यालयाच्या प्रांगणातील नरवीर तानाजी मालुसरे यांच्या पुतळ्यास तत्कालीन मुख्याद्यापक म्हणून सेवेत असणारे तात्याबा जाधवर सर यांचे हस्ते पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. यावेळी त्यावेळचे सर्व सहशिक्षकांच्या हस्ते पुतळ्याचे पूजन करण्यात आले.
या कार्यक्रमात माजी विद्यार्थ्यांनी आपापले मनोगत व्यक्त करताना आपल्या शालेय जीवनातील आठवणींना उजाळा दिला तर शालेय जीवनात घडलेल्या गमतीजमती ऐकताना सर्वजण भूतकाळात हरवून गेले होते.तसेच ज्यांना १९९४ साली दहावीसाठी शैक्षणिक मार्गदर्शन केले आणि आज विविध क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या आपल्या विद्यार्थ्यांना पुन्हा भेटण्याची संधी मिळाल्याचा आणि त्यांच्याशी झालेल्या गप्पागोष्टीमुळे विशेष आनंद झाल्याचे मत यावेळी बोलताना तत्कालीन शिक्षकांनी व्यक्त केले. सर्व शिक्षकवर्गाने माजी विद्यार्थ्यांशी संवाद साधला त्याचबरोबर अनमोल असे मार्गदर्शनही केले.यावेळी सर्व शिक्षकांचा स्मृती चिन्ह,शाल श्रीफळ व गुलाबपुष्प देऊन सन्मान करण्यात आला.
या कार्यक्रमाला माजी मुख्याध्यापक जाधवर सर,सहशिक्षक कडू सर,जगताप सर,मोरे मॅडम,माळवे सर,नवगिरे सर, शिंदे सर,बनसोडे सर आदी शिक्षक वर्ग उपस्थित होता.तर १९९४ साली दहावीत असणारे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अशोक मुजुमले यांनी केले तर संभाजी डिंबळे यांनी आभार मानले. हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी शांताराम चोरघे, मारूती डिंबळे, नवनाथ खाटपे, शरद घाटे यांनी विशेष प्रयत्न केला.