
दैनिक चालु वार्ता
कंधार प्रतिनिधी
माधव गोटमवाड
नांदेड :- केंद्रात व राज्यात बाल लैंगिक अत्याचार संरक्षण कायदा इतका प्रबळ असतानाही समाजात अनेक लहानग्या शाळकरी चिमुरडींवर लैंगिक अत्याचार होतोय, सुशिक्षित(?) नराधमांकडून त्यांची लचकी तोडली जातात. हे सर्व पाहिले की आधुनिकतेची कास धरणाऱ्या व महासत्तेची स्वप्ने पाहणाऱ्या समाजात संस्कृतीचा ऱ्हास होतोय की काय? असा एकच सवाल
मनात काहूर निर्माण करतोय. समाजात यासारख्या घटना पुनःपुन्हा घडू नयेत यासाठी शिक्षण संस्थेबरोबरच पालकांना देखील महत्त्वाची भूमिका पार पाडावी लागणार आहे.
आजच्या फॕशनच्या युगात वावरणारा समाज केवळ आपल्या कुमारवयीन मुलामुलींवर लक्ष ठेवताना दिसतोय. तो जितका महत्त्वाचा आहे त्यापेक्षा कैक पटीने किशोरवयीन मुलांचे लैंगिक शोषण तर होत नाही ना याकडे लक्ष देणे हीच काळाची गरज बनली आहे.
आपले चारित्र्य हे काचेच्या भांड्यासारखी असते, असे समजले जाते. त्यामुळे चांगला स्पर्श व वाईट स्पर्श याविषयी अनभिज्ञ असणाऱ्या कोवळ्या वयातील मुलामुलींच्या भांड्याला तडा जाण्यापासून वाचविण्याची जबाबदारी पालक व समाजाची आहे. पालकांची जबाबदारी : ‘मुले म्हणजे देवाघरची फुले’ या उक्तीला लाजिरवाणी, न साजेशी अपकृत्ये जेव्हा भोवतालच्या समाजात घडून येताना आढळतात.
तेव्हा मुलांचे बालपण त्यांच्यापासून हिरावून घेणार्या,
त्यांना कुस्करणार्या कुप्रवृत्तींचा राग आल्यावाचून राहवत नाही. परंतु कौटुंबिक किंवा सामाजिक पातळीवर हे विषय उघडपणे मांडणे हेही अनेकदा निषिध्द मानले जाते. अतिशय गंभीर अशा ह्या विषयावर घरात किंवा घराबाहेरही चर्चाविचार करण्यास लोक अनुत्सुक दिसतात. ”माझा काय संबंध?” ह्या प्रवृत्तीपासून ते ”असले विषय दूर राहिलेलेच बरे” इथपर्यंत असलेली सामाजिक उदासीनता कायदा व सुव्यवस्थेला आणि समाजाला घातकच ठरते.
मात्र त्यामुळे वस्तुस्थिती लपत वा बदलत नाही तर अधिकच बिकट होत जाते. त्याचबरोबर आज ऑनलाइनच्या काळात शिक्षणाच्या नावाखाली प्रत्येक मुलाच्या हातात स्मार्टफोन आले आहेत. त्याचा वापर शिक्षणासाठी होणे हे विधायक आहे परंतु आजकाल मुले अश्लील व्हिडीओ पाहत असल्याचे धक्कादायक गोष्टी समोर येत आहेत. त्यामुळे पालकांनी आपली मुले मोबाईलवर काय पाहत आहेत याकडे विशेष लक्ष देणे गरजेचे आहे. त्याचे सर्च हिस्ट्रीचा वापर करून मुलांवर लक्ष ठेवू शकतो.
संस्थात्मक पातळीवर शाळेची जबाबदारी : पालक, शिक्षक व विद्यार्थ्यांचे समुपदेशन सत्र आयोजित करणे, पालक व शिक्षकांच्या कार्यशाळा घेणे, शाळेतील मुलांना ‘वैयक्तिक सुरक्षे’अंतर्गत बोलते करणे, चांगला स्पर्श व वाईट स्पर्श ह्याबद्दल जागरूकता निर्माण करणे. जर ह्या संवादांतर्गत एखाद्या मुलाने, मुलीने जे काही सांगितले त्यातून त्याचे, तिचे शोषण होत आहे हे पुढे आले तर परिस्थितीनुसार ते पालक व शिक्षकांच्या निदर्शनास आणून देणे.
एक नागरिक म्हणून तुमचे कर्तव्य : पोलिसांना किंवा मुलांच्या संरक्षण संस्थांना कळवा. मुलांच्या संरक्षण संस्था मदत व सहकार्य करतात ना हे पाहा. समाजाचे सहकार्य मिळवा. प्रेसला कळवणे हा तुमचा शेवटचा उपाय असेल.
मुलांना नेहमी मोठ्यांची आज्ञा पाळायला सांगितले जाते. ह्या प्रक्रियेत ते मोठ्यांना नाही कसे म्हणायचे हेच विसरतात. जरी त्यांना मोठ्यांचे वागणे आवडत नसले तरीही ते अनेकदा मोठ्यांना ‘नाही’ म्हणू शकत नाहीत. मुलांना अशा परिस्थितीत ‘नाही’ म्हणायला शिकवा.
दाहक वस्तुस्थिती : काहीच महिन्याची लहान बाळे, किंवा थोडी मोठी मुले लैंगिक छळाला बळी पडतात. मुलीच जास्त लैंगिक छळाच्या बळी होतात असे नाही तर मुले देखील लैंगिक छळाला बळी पडल्याचे दिसून आले आहे. व्यंग असणारे किंवा मंदबुद्धी मुले त्यांच्या निराधारतेमुळे जास्तीत जास्त प्रमाणात लैंगिक छळाला बळी पडतात. युनिसेफ व भारत सरकारच्या महिला व बाल विकास मंत्रालयाने २००७ साली केलेल्या ‘बाल शोषणावर एक अध्ययन: इंडिया २००७’ सर्वेक्षणानुसार बाहेर आलेली काही धक्कादायक आकडेवारी : ५ ते १२ वयोगटातील मुलांना शोषणाचा व त्यांच्याशी गैरवर्तन केले जाण्याचा सर्वात जास्त धोका असतो.
या अत्याचारांमध्ये शारीरिक, लैंगिक तसेच मानसिक अत्याचारांचा समावेश होतो. सर्वेक्षणातील ५३.२२% मुलांनी कोणत्या ना कोणत्या स्वरूपात लैंगिक शोषण झाल्याचे सांगितले. बाल लैंगिक शोषणाला जबाबदार असणारी व्यक्ती ९०% त्यांच्या परिचयाची वा ओळखीची असते. अशी परिचित व्यक्ती आपल्या ओळखीचा, हुद्द्याचा व विश्वासाचा फायदा घेते आणि अश्लील कृत्ये करते.
अभिनव उपक्रमाची पुन्हा प्रभावी अंमलबजावणी होणे व त्याचा प्रचार व प्रसिद्धी होणे काळाची गरज आहे.