
दैनिक चालु वार्ता, वृत्तसेवा
मुंबई, दि. 27 :- पुणे येथे स्थापन झालेल्या देशातील पहिल्या क्रीडा विद्यापीठामुळे राज्यातील खेळाडूंना जागतिक दर्जाचे प्रशिक्षण मिळणार आहे. तसेच खेळाशी संबंधित विविध व्यवसायांना प्रोत्साहन मिळणार असल्याचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री सुनील केदार यांनी सांगितले. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे पुणे येथील कुराश असोसिएशन महाराष्ट्र, सलग्न भारतीय कुराश महासंघ यांच्या वतीने आयोजित गुणवंत खेळाडू सत्कार समारंभात ते बोलत होते.
श्री. केदार म्हणाले, आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठात बॅचलर इन स्पोर्टस, सायन्स , बॅचलर इन स्पोर्टस मॅनेजमेंट, मास्टर इन स्पोर्टस सायन्स, मास्टर इन स्पोर्टस मॅनेजमेंट या अभ्यासक्रमांना केंद्र सरकारने मान्यता दिली आहे. तसेच आता विद्यापीठ अनुदान आयोगाने सदर अभ्यासक्रमांना मान्यता दिली असल्याने या विद्यापीठातील खेळाडूंना सर्व पातळीवर मान्यता राहणार आहे. खेळाडूंच्या मेहनतीने पदक मिळतात. त्या मेहनतीला शाब्बासकीची थाप मिळणे गरजेचे असते. अशा सत्कार समारंभामुळे खेळाडूंना नवीन उर्जा मिळते. पुढील स्पर्धेसाठी प्रोत्साहन मिळते असेही त्यांनी स्पष्ट केले.
खेळाडूंना शासकीय सेवेत घेण्यासाठी आरक्षण आहे. या आरक्षणाच्या नियमात थोडी सुधारणा करण्याचे विचाराधीन असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. कार्यक्रमास अर्जुन पुरस्कार विजेते कुस्तीपटू काका पवार, कामगार आयुक्त श्रीकांत शिंदे, सुमित स्पोर्ट्सचे मोहसीन बागवान, कुस्ती प्रशिक्षक शिवाजी कोळी, सारा ग्रुप डॉक्टर बिपिन सूर्यवंशी, कुराश आसोसिएशचे अध्यक्ष रणजित जगताप, सचिव शिवाजी साळुंखे आदींची उपस्थिती होती.