
दैनिक चालु वार्ता
प्रतिनिधी मन्मथ भुस्से
व्यक्तीच्या मृत्यूनंतर अश्रु दाखवायचे स्मृतीग्रंथ प्रकाशित
होतात. असे होऊ नयेत असे, मला म्हणायचे नाही, मला एवढेच म्हणायचे आहे की, जीवंतपणी गौरवग्रंथ निर्माण झाले तर त्या व्यक्तीला मानसिक बळ मिळून तो चार वर्षे अधिक जगेल. त्या माणसाला कृतार्थ वाटेल,आपण जे काही योगदान दिले आहे,त्याची नोंद झालेली पाहून आनंद वाटेल. ग्रंथात नोंद करण्यात आलेले
आपलं योगदान आणि आपली योग्यता वाचल्यावर हे जरा आधीच लक्षात का बरे यांनी लक्षात आणून दिले नसले. आपण अधिक कष्ट करण्याची, अधिक चांगले वागण्याची प्रेरणा मिळाली असती. असं वाटणं, त्या गौरव ग्रंथाची फलनिष्पत्ती होय. अनेक जण अधिक काही करतीलही.
जीवंतपणी लिहिल्या आणि ग्रंथ नायकासमोर त्या गोष्टी आल्यामुळे त्याची विश्वासार्हता असते. आपल्या संपर्कातील आणि सहवासातील सामाजिक योगदान देणाऱ्यांना माणसांचे गौरव ग्रंथ आल्यामुळे कामाची कोणी नोंद घेत नाही.समाज कृतघ्न आहे.
असे नकारात्मक शेरे आणि तशाच स्वरूपाच्या इशा-यांना उत्तर मिळेल.सामाजिक योग्यदानाची दखल घेतली जाते. सामाजिक कार्याचा सन्मान होतो. असा सकारात्मक संदेश जाऊन इतरांना सामाजिक योगदानाची प्रेरणा मिळू शकते. आपल्यावर ग्रंथ निघेल म्हणून कुणी सामाजिक योगदान देते का?असा प्रश्न उपस्थित होऊ शकतो. पण असे ग्रंथ जीवंतपणी निघाले तर अनेक दस्तऐवज उपलब्ध होतात.
काही घरांमध्ये ऐतिहासिक वारसा जतन करण्याची दृष्टी नसल्यामुळे ती व्यक्ती मृत्यू पावल्यानंतर तिने वापरलेल्या वस्तू आणि इतर तिचे कच्च्या स्वरूपातील लेखनसामग्री रद्दीत,भंगारवाल्यांना देऊन टाकण्याची शक्यता नाकारता येत नाही. माझा सहकारी मित्र डॉ. रघुनाथ शेटे यांच्या सोबत मी एका आजारी असलेल्या प्राध्यापकाच्या घरी गेलो होतो. निवृत्तीनंतर तो एकटाच राहत होता.त्यांची पत्नी मुलीसोबत राहत होती.आपला नवरा आजारी आहे मी त्या प्राध्यपाकाची पत्नी भेटायला आली होती.
तेव्हा ती म्हणाली,”आमच्या सरांचे लिहिलेले आणि त्यांना प्रतिक्रिया आलेलं जे काही आहे, त्याला आता काय करायचं?
म्हणजे ते फेकून दिले पाहिजे असेच जणू सुचवायचे होते.
आम्ही आमचा इतिहास लिहून ठेवला नाही. इतिहासाकडे कमालीचे दुर्लक्ष केलेला आपला भारतीय समाज आहे.अनेकांना पंजोबाच्या वडिलांचे साधं नाव सांगता येत नाही. कामाच्या नोंदी फार दूर राहिल्या. समजा,मानव जातीच्या सुरुवातीपासून प्रत्येक जणांनी आपल्या घरातील माणसांचा संक्षिप्त का होईना इतिहास लिहून ठेवला असता तर आज आपल्याला समाजाचे ऐतिहासिक सत्य समजलं असते. किती किती स्थलांतरे आणि किती किती स्थित्यंतरे
लक्षात आली असती. काही पुराणांना इतिहास म्हणायची वेळ आली नसती. वर्णव्यवस्था जाती व्यवस्था,धर्मव्यवस्था कशा मानव निर्मित आहेत.
सुरूवातीपासून बघितले तर आपले सर्वांचे पूर्वज एक आहेत.आपल्याच पूर्वजांनी वेगवेगळे धर्म, पंथ,जाती भाषा,वर्ण ,नाव आडनाव, गोत्र निर्माण केले,यात जन्मतः श्रेष्ठ कनिष्ठ त्वचा कसलाच मुद्दा नाही,हेही लक्षात आले असते. कर्तबगार माणसे विशिष्ट समूहातच नाही तर सर्वत्र होती,हा बोध झाला असता.ज्यांनी काही इतिहास लिहून ठेवला त्यांनी त्यांचाच इतिहास लिहिला. तेच ऐतिहासिक पुरूष ठरले.बाकी इतिहास लिहून न ठेवलेले कर्तव्यशून्य ठरविले. असं घडू नये यासाठी किमान प्रत्येकांनी आपल्या सहवासातील आणि संपर्कातील माणसाचा तरी किमान इतिहास जतन करून ठेवला पाहिजे.त्याचा एक भाग म्हणजे गौरव ग्रंथ.
डॉ..हनुमंत मारोतीराव भोपाळे