दैनिक चालु वार्ता
पुणे प्रतिनिधी
शाम पुणेकर
पुणे :- महापालिका हद्द आणि खास करून नवीन समाविष्ट ३४ गावांतील अनधिकृत बांधकामांवर महापालिका प्रशासनाकडून जोरदार हातोडा चालविण्याची तयारी आहे. या कारवाईचा मोठा फटका नवीन समाविष्ट गावांना बसू शकतो. यामुळे संबंधित मिळकतधारकांनी स्थानिक लोकप्रतिनिधींकडे “साकडे’ घालण्यास सुरुवात केली आहे. महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आपल्या गावांत अशी कारवाई रोखून मतांच्या राजकारणासाठी नागरिकांना खूष ठेवण्यासाठी माजी नगरसेवकांसह गावांतील इच्छुकांकडूनही आटापिटा सुरू आहे.
यासाठी पालिका प्रशासकांच्या भेटीगाठी घेण्यासह मुुंबई”वरून” सेटिंग लावण्याचाही प्रयत्न होत आहे. त्यामुळे समाविष्ट गावांतील अनधिकृत बांधकामांवर कारवाई करताना प्रशासकांना राजकीय दबावासह स्थानिक लोकप्रतिनिधींच्या विरोधाला सामोरे जावे लागू शकते. असे असले तरी कोणाचाही मुलाहिजा न ठेवता सर्व अनधिकृत बांधकामावर कारवाई करण्याची प्रशासकांची जोरदार तयारी सुरू आहे. या धडक कारवाई मुळे संबंधितांचे धाबे दणाणले आहेत.