
दैनिक चालु वार्ता
कंधार प्रतिनिधी
माधव गोटमवाड
‘महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे’ स्वातंत्र्याच्या काळात साधूसंतांनी फार महत्त्वाचे कार्य केले आहे. अशाच-राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचा जन्म अमरावती जिल्ह्यातील यावली या गावी ३० एप्रिल १९०९ रोजी झाला, भारत देश पारतंत्र्यात असताना तरुणांना एकत्रित आणण्याचे महत्त्वाचे कार्य तुकडोजी महाराजांनी केले ,जनसामान्यांच्या मनात देशप्रेम जागृत करून इंग्रजाविरूद्ध बंड पुकारले त्यांच्या वाणीत परिवर्तनाची ताकद होती ,म्हणूनच सर्व जातीधर्माचे लोक आपापसातील मतभेद विसरून राष्ट्रीय कार्यासाठी एकत्र आले होते,
“झाड झडुले शस्त्र बनेंगे
भक्त बनेंगी सेना।।
पत्थर सारे बाॅम्ब बनेंगे।
नाव लगेगी किनारे।।”
या देशभक्ती पर गीतामुळे तुकडोजी महाराजांना विदर्भातील चंद्रपूर व वर्धा जिल्ह्यात प्रवेश नाकारला होता, तरीही महाराज डगमगले नाहीत, “चेत रहा है भारत दुखसे । आग बुझाना मुश्किल है।। ”
यासारख्या राष्ट्रभक्ती पर गीतामधून स्वांतत्र्याची ज्योत सतत तेवत ठेवली,या गीतामुळे महाराजांना नागपूर व रायपूर येथील तुरुंगात १२२ दिवस डाबूंन ठेवले होते ,तरीही तुकडोजी महाराज देशाला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी तरूणांना देशभक्ती पर गीतामधून स्फृती व चेतना देऊन त्यांचा जोश वाढवत असत.
१९६२ साली चीनने भारतावर आक्रमण केले, तेव्हा महाराजांनी संरक्षण निधीला व सैनिकी शाळेला गीतामधूनच प्रोत्साहीत केले, त्यांच्या या धाडसी कार्यामुळेच भारताचे तत्कालीन राष्ट्रपती
डॉ राजेंद्र प्रसाद यांनी तुकडोजी महाराजाना ‘राष्ट्रसंत” या उपाधीने सन्मानित केले आहे, तसेच महाराष्ट्र शासनाने त्यांच्या कार्याची दखल घेऊन ‘नागपूर विद्यापीठाला ‘श्री संत तुकडोजी महाराजांचे नाव दिले आहे, महाराष्ट्रातील एक आधुनिक संत,कीर्तनकार, महंत, लेखक,कवी, व थोर समाजसुधारक म्हणून त्यांना सर्वत्र ओळखले जाते, त्यांनी”ग्रामगीता लिहुन समाजामध्ये चैतन्याचे व उत्साहाचे वातावरण निर्माण केले.
“खंजिरी ” हे राष्ट्रसंत तुकडोजी महाराजाचे एक आवडते वाद्य होते, त्यामुळे त्यांना “खंजिरीवाले” महाराज म्हणून ही ओळखले जात असे, अंधश्रद्धा , जातिभेद,अस्पृश्यता यांसारख्या अनिष्ट रूढी व परपरांवर महाराजांनी कीर्तनाच्या व भजनाच्या माध्यमातून समाजात परिवर्तन व प्रबोधन घडवून आणले, “आत्मसंयमनाचे विचार त्यांनी “ग्रामगीता” काव्यातून मांडले,” ‘ग्रामगीता’ त्यांनी ग्रामदेवतेलाच अर्पण केली, त्यांना प्रत्येक गाव वैकुंठ करावयाचे होते, ग्रामोन्नती आणि ग्रामविकास हा त्यांच्या विचार सरणीचा केंद्रबिदू होता,त्यांनी मराठी व हिंदी भाषेतून पन्नास पुस्तके लिहून प्रकाशित केली आहेत,
१९३५ मध्ये” मोझरी”येथे गुरूकुंज आश्रमाची स्थापना केली.
१९४२च्या ऑगस्ट क्रांतीचा वणवा सर्वत्र पसरला होता, अनेकांनी आत्मबलिदान केले, आंदोलकांची संख्या भरपूर प्रमाणात वाढली, त्यावेळी साने गुरुजी व तुकडोजी महाराजांनी राष्ट्रभक्ती पर गीतांनी आंदोलकांचा उत्साह वाढविला, मनुष्याला संगत व सोबत चांगली असावी, म्हणून ते म्हणतात,
“संगत करावी सदा सज्जनांची।
सावली नसावी कधी दुर्जनांची।।
मानव धर्माची शिकवण सुरू करण्यासाठी १९४३ मध्ये “श्रीगुरूदेव” मासिक सुरू केले, आयुर्वेदिक वर्ग चालवून वनस्पतीची माहिती करून दिली, व्यसनमुक्ती द्वारे समाजातील व्यसनी लोकांच्या संसाराची कशी राखरांगोळी होते,याचेही प्रबोधन केले, गरीब व होतकरू लोकांना भूदान चळवळीद्वारे ११ दिवसात ११ हजार ४४० हेक्टर भूमी भूदानाने मिळविले , संत तुकडोजी महाराजा बद्दल समाजात काही गैरसमज पसरले होते, तेव्हा महात्मा गांधींनी तुकडोजी महाराजांना सेवाग्रामला बोलावून घेतले, तेथेच सूत कसे कातले जाते, याची थोडी माहिती संत तुकडोजी महाराजांनी करून घेतली.
नंतर ते खादीचे कपडे वापरू लागले, महात्मा गांधीच्या जवळ असताना राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी “लहर की बरखा” हे पुस्तक लिहिले आणि दोघांमध्ये संवाद साधून आनंद निर्माण झाला, काही भजनातून महात्मा गांधी अतिशय खुष होऊन सोमवारचे व्रत सोडून दिले होते, महात्मा गांधींच्या स्मरणार्थ १०० गावे महाराजांनी आदर्श केले होते, १९४८ मध्ये हैदराबाद मुक्तिसंग्रामात अनेक हिंदू लोकांवर अन्याय व अत्याचार केले जात होते, तेव्हा संत तुकडोजी महाराजांनी गावोगावी फिरून राष्ट्रीय एकात्मतेला बळकटी आणण्यासाठी महत्त्वाचे कार्य केले, तरूणांना ते सारखा उपदेश करत असत,
” युवकांनी बलवान व्हावे,।
नीतिमान व बुद्धीमान व्हावे,।
असे अत:करणातून सांगून एकात्मता घडवून आणण्यासाठी नेहमीच प्रयत्न करत असत, एवढ्यावर न थांबता पुढे आणखी समज देतात,
“बसला कशाला। आळशी बनायला।
चाल पुढे देशाच। काम करायला।।”
१९६५ मध्ये त्यांनी लिहुन ठेवलेले महत्त्वपूर्ण संदेश “अन्नसुरक्षा धोरण” भारत सरकारने आता अमलात आणण्याचे ठरविले आहे,
समाजातील सर्व लोक गुण्यागोविंदाने नांदावे उच्च-नीच भेदभाव करू नये, म्हणून त्यांनी सहभोजनाची सुरूवात केली, त्यामुळे अनेक जातिधर्मातील लोक एकत्र आले, अहेरी संस्थानातील आदिवासी लोकांना एकत्रित करून मार्गदर्शन केले.
विश्वधर्म परिषदेसाठी १९५२ मध्ये तुकडोजी महाराजांना अमेरिकने निमंत्रित केले होते, तेथे जाऊन त्यांनी सर्वांची मने जिंकून घेतल्यामुळे त्यांना १८ देशाच्या वेगवेगळ्या समिती वर सल्लागार म्हणून अतिशय उत्कृष्ट कार्य करत होते, १९६५ मध्ये पाकिस्ताने भारतावर आक्रमण केले, तेव्हा तुकडोजी महाराजांनी लाहोर सीमा दौरा करून लष्कराला जोशात आणले, म्हणूनच त्यांना देशप्रेम जागृत करणारे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज असे म्हटले जाते, राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या पसायदानातून आपल्याला राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश मिळतो,
या भारतात बंधूंभाव नित्य वसु दे।
दे वरचि असा दे ।
हे सर्व पंथ- संप्रदाय एक दिसु दे।
मतभेद नसुू दे।।
समाजसेवा हीच ईश्वर सेवा समजून लोकांना सुधारण्यासाठी व एकाच छत्राखाली आणण्यासाठी त्यांनी धार्मिक माध्यमातून प्रबोधन केले,
संत तुकडोजी महाराजांच्या कार्याची दखल घेऊन भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू, तसेच भारताचे पहिले राष्ट्रपती डॉ राजेंद्र प्रसाद, व लाल बहादूर शास्त्री, स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर, आचार्य प्रल्हाद केशव अत्रे, जयप्रकाश नारायण यांनी मुक्त कंठाने त्यांच्या कार्याची प्रशंसा केली.
संत तुकडोजी महाराज शेवटपर्यंत अविवाहित राहिले,
आजच्या तरुणांनी देशासाठी कार्य केले पाहिजे, बुद्धीचा शक्तीचा वापर गोरगरिबांना सांभाळण्यासाठी केला तर किती तरी व्यक्तीच्या जीवनात प्रकाश पडेल, जादूटोणा,मंत्र तंत्र, अंधश्रद्धेच्या विळख्यात अडकून न पडता तरूणांनी सदसद्विवेकबुद्धीने विचार करून निर्णय घ्यावे,आमिषाला बळी पडू नये़,विज्ञानाची कास धरावी, सत्य वागावे, खंजिरी वाजवण्यास शिकावे, ती कला लुप्त होऊ देऊ नये, गावातील मंदिर, शाळा, चावडीच्या ठिकाणी फुरसतीच्या वेळी’ ग्रामगीता’ वाचून दाखवावी, व प्रत्यक्षात त्याची अंमलबजावणी करावी, म्हणजे समाजामध्ये जनजागृती होईल.
संत तुकडोजी महाराजांनी देशाच्या, मानवतावादाच्या, धर्माच्या सर्वागीण विकासासाठी केलेले कार्य अमर आहे, म्हणून तर म्हणतात “मरावे परी कीर्ती रुपी उरावे” राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या जयंतीच्या निमित्ताने त्यांना कोटी कोटी
प्रणाम,
साहित्यिक
प्रा, बरसमवाड विठ्ठल गणपतराव
अहमदनगर